विशेष प्रतिनिधी
पुणे : “शिक्षणामुळे आज समाजात माहिती आणि बुद्धीने समृद्ध असलेला वर्ग दिसत आहे. मात्र, ज्ञानकेंद्रित शिक्षणाच्या अभावामुळे परिपूर्ण माणूस घडण्याची प्रक्रिया काहीशी खुंटली आहे. यासाठी सर्वच स्तरांवर शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन होणे आवश्यक आहे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
डीईएस पुणे विद्यापीठाच्या शिक्षण विद्याशाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, सचिव डॉ. आनंद काटीकर, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे आणि विद्याशाखा प्रमुख डॉ. जयंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
भैय्याजी जोशी म्हणाले, “शिक्षणातून केवळ माहिती न देता विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन होणे ही काळाची गरज आहे. बाह्य रूपाने व्यक्तिमत्त्व विकसित करणे सोपे आहे; परंतु ‘व्यक्तित्व’ विकसित करणे अधिक आव्हानात्मक असते. हे केवळ पुस्तकी ज्ञानाने साध्य होत नाही. त्यासाठी शिक्षण सम्यक, संतुलित आणि समन्वित असणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तित्व विकासाचा मार्ग प्रशस्त करायला हवा.” सज्जन शक्तीच्या व्यावहारिक प्रकटीकरणाची गरजही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
डॉ. रवींद्र आचार्य यांनी आपल्या स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या समाजाभिमुखतेवर भर दिला. “मनुष्य निर्माणाच्या प्रक्रियेत आदर्श शिक्षक घडविण्याचे काम या विद्याशाखेतून होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी विद्यापीठाच्या विविध अभिनव उपक्रमांची माहिती दिली.
– गुणवत्तापूर्ण शिक्षकांची आवश्यकता
डॉ. जयंत कुलकर्णी यांनी विद्याशाखेच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “राष्ट्र आणि समाजनिर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची गरज आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित शिक्षक या विद्याशाखेतून घडवले जातील. येथे स्थापन करण्यात येणारे ‘सम्यक केंद्र’ सामाजिक समस्यांचे अध्ययन, प्रशिक्षण, जनजागरण, नीती निर्धारण आणि शिक्षक विकासासाठी कार्य करेल.” ॲड. अशोक पलांडे यांनी आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App