विशेष प्रतिनिधी
मुंबई : Narayan Rane महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून रंगलेल्या चर्चेत आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. “उद्धव ठाकरे सध्या डिप्रेशनमध्ये गेले असून ते जे बोलतात त्याला वास्तवाचा कोणताही आधार नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का?” अशा बोचऱ्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.Narayan Rane
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने यश मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. ठाकरे बंधुंना केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले. महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले. आपला महापौर व्हावा, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंच्या या सूचक विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी उपरोक्त विधान केले.Narayan Rane
नेमके काय म्हणाले नारायण राणे?
उद्धव ठाकरे यांनी ‘देवाच्या इच्छेने महापौर आमचाच होईल’ असे विधान केले होते. त्यावर टोला लगावताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहत आहेत, पण त्यांनी देवाला आतापर्यंत कधी जोडलेच नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मग तुमचा महापौर कसा होणार? एकदा संख्याबळ तपासून बघा. एवढा मोठा फरक तुम्ही कसा भरून काढणार? त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का?”
ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही नारायण राणेंनी निशाणा साधला. “सुरुवातीला जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होते, तेव्हा ते काही करू शकले नाहीत. वेगळे झाल्यावरही त्यांना काही करता आले नाही आणि आता पुन्हा एकत्र येऊनही ते काही करू शकले नाहीत. आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवल्यामुळे आता नफा-तोटा काय असतो, याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत आहे. त्यांची शिवसेना आता फक्त नावाला उरली आहे,” असे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना दिला घरी बसण्याचा सल्ला
राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहताय का? पण देवाला आतापर्यंत कधी जोडले नाहीत. त्यांनी संख्या बघावी. त्यांचा महापौर कसा होणार? त्यामुळे उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत. ते बोलतात ते वास्तव नाही. भाजप, शिवसेना शिंदे युतीची महाराष्ट्रातील जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये सत्ता आली आहे. आता तरी शहाणे बनून घरी बसावे आणि जे ऑपरेशन करायचे ते करून घ्यावे”, असा बोचरा सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App