विशेष प्रतिनिधी
पुणे : Naresh Arora उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सुरुवातीला मोठी खळबळ उडाली होती. मात्र ही कोणतीही अधिकृत पोलिस कारवाई नसल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पोलिसांच्या या पथकाकडून कार्यालयातील कागदपत्रांची केवळ प्राथमिक पाहणी केली जात असल्याची माहिती समोर येत असली तरी, नरेश अरोरा यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणाबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.Naresh Arora
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश अरोड़ा व त्यांची संस्था ‘डिझाइनबॉक्स्ड’ यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही.Naresh Arora
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा नरेश अरोड़ा व त्यांची संस्था ‘डिझाइनबॉक्स्ड’ यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे.
या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नैरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे. या संपूर्ण विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयम, जबाबदारी आणि स्पष्टतेसह आपली भूमिका मांडत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
अनावश्यक तर्क-वितर्क पसरवले जात आहेत- सुनील तटकरे
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत म्हटले की, नरेश अरोड़ा आणि त्यांची संस्था ‘डिझाइनबॉक्स’ यांच्या पुणे कार्यालयाबाबत अनावश्यक तर्क-वितर्क पसरवले जात आहेत. वास्तविकता अशी आहे की संबंधित यंत्रणांनी नियमित प्रक्रियेअंतर्गत माहिती घेतली असून पूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब समोर आलेली नाही. या विषयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नरेश अरोड़ा आणि त्यांच्या संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास असून, निष्कर्ष केवळ तथ्यांच्या आधारेच काढले गेले पाहिजेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विकास पासलकर यांनी नरेश अरोरा यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी काम करणारे नरेश आरोरा आणि त्यांची डिझाईन बॉक्स कंपनी, आज त्यांच्या कंपनीत क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. ही कुठल्याही प्रकारे रेड किंवा एफआयआर हे दाखल झालेले नाही. प्रक्रियेचा भाग असल्यामुळे भेट देण्यात आली होती. त्यांना सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे.
कोण आहेत नरेश अरोरा?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू राजकीय सल्लागार मानले जाणारे नरेश अरोरा आणि त्यांची ‘डिझाईन बॉक्स’ ही कंपनी लोकसभा निवडणुकीपासून पवारांच्या राजकीय रणनीतीची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. अजित पवारांच्या सार्वजनिक सभांचे नेटके नियोजन करण्यासोबतच, जनमानसात त्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक आखणी करणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची तांत्रिक व संघटनात्मक मदत पुरवणे, अशी महत्त्वाची जबाबदारी ही कंपनी पार पाडत असून पवारांच्या राजकीय वाटचालीत या कंपनीची भूमिका अत्यंत कळीची मानली जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App