विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी खड्यासारखे बाजूला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. बानेर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण आणि गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.Ajit Pawar
पवार म्हणाले की, पुणे शहरात मागील पाच वर्षांत ७३ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, मात्र त्या प्रमाणात पुण्याचा विकास झालेला नाही. हा निधी कुठे गेला, हे तपासण्याची वेळ आली आहे. मागील काही वर्षांपासून पुण्यात नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या त्रिमूर्तीने अनागोंदी कारभार चालवला असल्याचा आरोप त्यांनी केला.Ajit Pawar
पुणे शहर जगात चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित आणि वाहतुकीची कोंडी असलेले शहर बनले आहे, ही शरमेची बाब आहे. पुण्यात १२ हजार ३५० लोक रोज स्वच्छतेचे काम करण्यासाठी आहेत, तरीही शहर स्वच्छ का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इंदूर शहर देशात स्वच्छतेत पहिले येऊ शकते, तर पुणे का नाही, असेही त्यांनी विचारले.
पुण्याचा कारभारी बदलल्यास शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ग्वाही पवार यांनी दिली. प्रशासनावर आपली पकड असून, नियोजनबद्ध विकासकामे कशी करायची याचा प्रदीर्घ अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना उमेदवार अमोल बालवडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. मागील ११ वर्षे भाजपच्या माध्यमातून समाजसेवेसाठी दिली. काही राजकीय महत्त्वाकांक्षाही होत्या, मात्र भाजपच्या दोन नेत्यांनी माझा राजकीय घात केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या आई-वडिलांसमोर समजूत काढली होती, असे बालवडकर म्हणाले.
बालवडकर यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांचा मान ठेवून मी थांबलो होतो. मात्र, आता पुढील चार वर्षांत माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या मंत्र्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध अहंकारी नेता अशी आहे. चंद्रकांत पाटील यांनी केवळ चॉकलेट वाटण्याची कामे केली, कोणतीही विकासकामे केली नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App