वेळीच वेसण नाही घातली म्हणून हिंमत झाली!!

नाशिक : वेळीच वेसण घातली नाही म्हणून हिंमत झाली, असे म्हणायची वेळ अजित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली. अजित पवारांनी पिंपरी – चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्यापासून ते राज्य सहकारी बँक लुटून खाल्ल्याचे आणि पुण्यातल्या जमीन घोटाळा मध्ये सामील झाल्याचे आरोप आहेत, त्याच अजित पवारांना भाजपची “राक्षसी भूक” टोचली!!, हे राजकीय सत्य आज पिंपरी चिंचवड मधून बाहेर आले. याला कारणीभूत फक्त अजित पवार नसून त्यांना सत्तेच्या वळचणीला बसवून घेणारे भाजपचे नेते मुळात कारणीभूत आहेत. भाजपला गरज नसताना भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना स्वतःच्या सत्तेच्या वळचणीला बसवून घेतले. त्यांना उपमुख्यमंत्री करून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या, त्याच अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मधून भाजपवर दुगाण्या झोडल्या. भाजपची राक्षसी भूक आपल्याला पाहावत नाही, असे अजित पवार भर पत्रकार परिषदेत म्हणाले.

याच अजित पवारांवर भाजपचे नेते आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्यात 70000 कोटी रुपये खाल्ल्याचे आरोप केले होते. अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँक लुटून खाल्ल्याचे आरोप झाले होते. या दोन्ही घोटाळ्यांच्या चौकशी आणि तपास यांचे फास पवार काका – पुतण्यांच्या भोवती आवळल्यानंतर पवार पुतण्याला भाजपच्या सत्तेला शरण जावे लागले. त्याआधी पवार काकांनी सुद्धा भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायचे प्रयोग केले होते.

– पार्थचा जमीन घोटाळा

भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर सुद्धा अजित पवारांचे वेगवेगळे “उद्योग” थांबले नव्हते, म्हणून तर भाजपच्याच राजवटीत मुंढव्यातला पार्थ पवारचा जमीन घोटाळा समोर आला. 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन 300 कोटी रुपयांत खाण्याचा “उद्योग” बाहेर आला. तरीसुद्धा भाजपच्या नेत्यांनी अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार याला मोकळे सोडले. शक्य असून सुद्धा आणि हातात सर्व प्रकारच्या यंत्रणा असून सुद्धा दोघांवर कुठली कारवाई केली नाही.

– अजित पवार भाजप वर उलटले

पण आता तेच अजित पवार भाजपवर उलटले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपवर दुगाण्या झोडत सुटलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेवी 4800 कोटी रुपयांच्या असताना त्या वाढायला हव्या होत्या पण त्या ठेवी 2000 कोटी रुपयांवर आल्या. भाजपची राक्षसी भूक आपल्याला पखहावत नाही म्हणून आपण हे बोलतो, असे अजित पवार म्हणाले.



– म्हणे कुत्र्याच्या नसबंदीत पैसे खाल्ले

आपल्या स्वतःच्या काळात पिंपरी चिंचवडचा फार मोठा विकास झाला. वाहतूक सुसाट होती पण भाजपच्या पाच वर्षांच्या काळात महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली. भाजपच्या स्थानिक आमदारांनी आणि नेतृत्वाने टेंडर रिंग केली. लोकांना दमदाटी केली. उमेदवारी मागे घ्यायला लावली. कुत्र्यांच्या नसबंदीत यांनी पैसे खाल्ले. सगळी महापालिका यांनी धुवून खाल्ली आपण लँड माफिया भंगार माफिया हे शब्द ऐकलेत पण पिंपरी चिंचवड मध्ये खोदाई माफिया झालेत. वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ते पिंपरी चिंचवड मध्ये मोठमोठे खड्डे खणून ठेवतात. त्यात पैसे खातात, याचे पुरावे देईन. उगाच कुणावर खोटे आरोप करणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

– वेसण घातली नाही म्हणून

ज्या भाजपच्या सत्तेच्या ताटात अजित पवारांनी खाल्ले त्याचातच त्यांनी छेद केला. ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आणि दादागिरीचे आरोप आहेत, त्याच अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आणि दादागिरीचे आरोप केले. भाजपने संधी असून सुद्धा अजित पवारांच्या भ्रष्टाचाराला आणि दादागिरीला वेसण घातली नाही. त्यांच्या भोवती चौकशी आणि तपासाचा फास आवळला नाही म्हणून अजित पवारांची भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून भाजपच्या नेत्यांवर बेछूट आरोप करायची हिंमत झाली.

– राजकीय वास्तव विसरून चालणार नाही

काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी असेच काँग्रेसला छळले होते. काँग्रेसला पोखरूनच त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मधली सत्ता हिसकावली होती. त्यावेळी दुबळ्या असणाऱ्या भाजपने अजितदादांना “आतून” मदत केली होती. त्यावेळी अजितदादांना भाजपची मदत “गोड” वाटली होती. पण अजितदादांचेच वर्चस्व मोडून भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांची सत्ता हिसकावल्यानंतर अजितदादांना तिथला भ्रष्टाचार दिसला. पण त्याचवेळी खुद्द त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडालेत, हे मात्र त्यांना स्वतःला दिसले नाहीत. पण काही झाले, तरी भाजपने अजितदादांना वेळीच वेसन घातली नाही म्हणून त्यांची भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायची हिंमत होऊ शकली, हे राजकीय वास्तव विसरून चालणार नाही.

BJP leaders are themselves responsible for Ajit Pawar’s “Dadagiri”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात