विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP Checks नगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना संधी देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी मात्र आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. “पक्षासाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा,” या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रकर्षाने दिसून आली.BJP Checks
मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. भाजपच्या उपरोक्त निर्णयामुळे आज अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भाजपच्या आमदार आणि खासदार पुत्रांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.BJP Checks
नाशिकमध्ये दोन आमदारांच्या वारसांची माघार
नाशिकमध्ये भाजपच्या दोन आक्रमक महिला आमदारांच्या मुलांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाने भरलेला उमेदवारी अर्ज पक्ष धोरणानुसार मागे घेण्यात आला. “पक्षाच्या या निर्णयामुळे सामान्य कार्यकर्त्यांना बळ मिळेल,” अशी प्रतिक्रिया फरांदे यांनी दिली. तर आमदार सीमा हिरे यांच्या मुलीनेही नाशिक महापालिका निवडणुकीतून आपले नाव मागे घेतले आहे.
कोल्हापुरात महाडिक पुत्राची माघार
खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनीही कोल्हापुरातून माघार घेतली आहे. कृष्णराज यांनी सुरुवातीला वरिष्ठांच्या परवानगीने अर्ज भरला होता, मात्र राज्य पातळीवर ‘घरातील व्यक्तींना उमेदवारी नाही’ हा नियम ठरल्यानंतर त्यांनी तत्काळ माघार घेण्याचा निर्णय घेतला. “आम्ही पक्षाचे आदेश मानणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत,” असे धनंजय महाडिक यांनी यावेळी स्पष्ट केले.
नार्वेकर कुटुंबीय ठरले अपवाद
दरम्यान, भाजपच्या या कडक नियमावलीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कुटुंब मात्र अपवाद ठरले आहे. नार्वेकर यांच्या भावाला आणि वहिनीला पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात काही प्रमाणात उलट-सुलट चर्चाही सुरू आहेत.
नाराजांची समजूत काढण्याचे आव्हान
तिकीट न मिळाल्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे. याबाबत खासदार महाडिक म्हणाले की, “महायुतीची सांगड घालताना काही ठिकाणी अन्याय झाला असू शकतो, मात्र आम्ही दोन दिवसांत सर्व नाराजांची समजूत काढू. अनेक काँग्रेसचे इच्छुक आमच्या संपर्कात आहेत, मात्र आमची यादी आता निश्चित झाली आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App