नाशिक : मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था एखाद्या लटकत्या खेळण्यासारखी झाली. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या पेक्षा सहा पट कमी लेखले. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 62 जागा सोडल्या, पण पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 9 जागा ऑफर केल्या. पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांचे राजकीय शिष्य संजय राऊत यांनी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सोंगटी मनसेच्या गोटात ढकलून दिली.
– त्याचे झाले असे :
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सोडून सगळ्या पक्षांशी आघाडी करायचा प्रयत्न केला. पवारांची राष्ट्रवादी आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेली. पण अजित पवारांनी असा काही जमालगोटा दिला, की पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी चिन्ह आणि अख्खा पक्षच धोक्यात आला. त्यामुळे पवारांचा राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसकडे आघाडी करण्यासाठी गेले. पण मुंबईत काँग्रेसने पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 9 जागा देऊ केल्या. म्हणून पवारांचे नेते नाराज झाले. ते काँग्रेसच्या दारातून बाहेर पडले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा देऊ केल्या. पण त्या फारच तोकड्या ठरल्या. म्हणून पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई शहराध्यक्षा राखी जाधव यांना आपले समर्थक उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे पाठवायला सांगितले. त्यांना घड्याळ चिन्हावर उभे राहायला सांगितले. त्यामुळे राखी जाधव चिडल्या. त्यांनी पक्ष सोडून दिला आणि त्या भाजपमध्ये निघून गेल्या.
– पवारांना सोडलेल्या जागेत मनसेचा खोडा
तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या 10 जागा सोडल्या, त्या सहजासहजी किंवा सुखासुखी सोडल्या नाहीत, तर त्यात मनसेचा खोडा घालून ठेवला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईतल्या ज्या जागा हव्या आहेत, त्यापैकी काही जागा ठाकरे बंधूंपैकी राज ठाकरे यांच्या मनसेच्या कोट्यात गेल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्या जागा हव्या असतील, तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करण्याऐवजी मनसेच्या नेत्यांशी चर्चा करावी, अशी सूचना संजय राऊत यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना केली. आपल्याकडे आलेली पवारांच्या राष्ट्रवादीची सोंगटी संजय राऊत यांनी मनसेच्या गोटात ढकलून दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अशी चोहोबाजूंनी कोंडी झाली असताना पवारांच्या राजकीय शिष्याने सुद्धा त्यांची साथ संगत सोडून दिली.
– शिंदे – मनसे उमेदवार जाहीर नाहीत
मुंबई महापालिकेच्या निवडणुका एवढ्या रंगतदार स्थितीत आल्या आहेत, की भाजप, उबाठा शिवसेना यांनी आपले 50 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर केले, पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे अद्याप आपले उमेदवार जाहीर करू शकलेले नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तर अवस्था एवढी बिकट झाली आहे, की पुण्याच्या पाठोपाठ त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षा राखी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये निघून गेल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App