विशेष प्रतिनिधी
मुंबई: Prakash Mahajan मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही निशाणा साधला. सध्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही नवीन लोकं युती करत आहेत. त्यांनी पूर्वीच त्यांचा अनुभव घेतला आहे. पण आता ते पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणताना म्हणालेत.Prakash Mahajan
प्रकाश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून ते कोणत्या पक्षात जाणार? असा प्रश्न विचारला जात होता. आज अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करून या चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, मी प्रकाश महाजन यांचे मनापासून शिवसेनेत स्वागत करतो. त्यांनी शिवसेना व माझ्यावर विश्वास ठेवून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश झाला.Prakash Mahajan
प्रकाश महाजन मुळातले शिवसैनिक
मी अगदी जवळून प्रकाश महाजन यांची कार्यपद्धती पाहिली. ते बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले मुळातले शिवसैनिक आहेत. त्यांना जी जबाबदारी मिळाली, त्यांनी ती अतिशय जबाबदारीने व सकारात्मकतेने पार पाडली. सर्वसामान्य माणसांचे काम व अडचणी आपण सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणूनच सोडवता येतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्याकडे अनेक पदे होती. पण त्यांनी कधीही पदाचा मोठेपणा दाखवला नाही. ते उत्कृष्ट वक्ते व प्रवक्ते आहेत. मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी त्यांना ऐकले.
राजकीय क्षेत्रात संयम महत्त्वाचा असतो. काही लोकं सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्ये करतात. पण प्रकाश महाजन यांनी बोलताना नेहमीच स्वतःची प्रतिष्ठा पाळली. राजकारणात पाळली जाणारी पथ्य सोडली नाही. त्यामुळे मला त्यांचे वर्कृत्व व कर्तृत्व भावले. आता ते माझ्यासोबत शिवसेनेत काम करत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, प्रकाश महाजन यांनी माझ्या अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ पाहिला. मी मुख्यमंत्री असताना व आताही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. याची जाणीव मला आहे. त्यामुळेच आज त्यांनीही त्याचा उल्लेख केला. सध्या अनेकजण शिवसेनेत येत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे यांची शिकवण व विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे प्रकाश महाजन कोणत्याही स्वार्थाशिवाय शिवसेनेत आलेत. त्यांच्यामुळे शिवसेना बळकट होईल. आमच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळेल. ते प्रवक्ते म्हणून पक्षाची चांगली भूमिका पार पाडतील. त्यांच्यावर संघटनेचीही जबाबदारी टाकली जाईल.
राज व उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठाकरे बंधूंवरही निशाणा साधला. तसेच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कटू अनुभव घेण्यासाठी उद्धव ठाकरेंशी युती केल्याचाही दावा केला. ते म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेशी बांधील आहोत. ज्यांनी विचारधारेशी प्रतारणा केली, त्यांना लोकांनी लोकसभा, विधानसभा व आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जागा दाखवली. येणाऱ्या महापालिका निवडणुकांतही आम्ही बाळासाहेबांचे विचार व विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहोत. त्यामुळे महायुतीचाच विजय होईल.
भाजप व शिवसेनेची युती सत्तेसाठी झाली नाही. खुर्चीसाठी झाली नाही. स्वार्थासाठी झाली नाही. आता ज्या काही युत्या व आघाड्या होत आहेत, त्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही लोकं नवीन युत्या करत आहेत. काही लोकांनी यापूर्वीही त्याचा अनुभव घेतला आहे. ते आता पुन्हा नवा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत. पुढच्याच ठेच मागचा शहाणा असे होते. पण आता काय होते ते मला माहिती नाही, असे शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App