विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nylon Manja देशभरात सर्वत्र मकर संक्रांत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संक्रांत सण जवळ आला की आकाशात पतंगांची अक्षरशः गर्दी दिसायला लागते. मात्र, हा पतंग उडवण्यासाठी नायलॉन दोऱ्याचा वापर गेल्या काही वर्षात वाढला असून यामुळे अनेक अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे देखील चिरल्याच्या घटना घडत आहेत. या नायलॉन मांजाच्या विरोधात नागरिकांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.Nylon Manja
न्यायालयाने नायलॉन मांजा प्रकरणी गंभीर दखल घेत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत. अन्यथा नायलॉन मंजाचा वापर करणाऱ्या मुलांच्या पालकांना आणि विक्री करणाऱ्यांना मोठ्या दंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. तसेच या संदर्भात गृह विभागाच्या सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्रे पाठवली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्राणघातक नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर अडीच लाख आणि वापरणाऱ्यांवर 50 हजार रुपये दंड ठोठावण्याच्या सूचना विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.Nylon Manja
नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांची दखल घेत, न्यायालयाने 2021 मध्ये स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. गेल्या तीन वर्षांत परिस्थितीत कोणताही समाधानकारक बदल न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर आणि तो वापरून पतंग उडवणाऱ्यांवर आता कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा ठाम निर्धार न्यायालयाने व्यक्त केला असून प्रशासनाला त्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 27 डिसेंबर रोजी सर्व वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावर जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटीसद्वारे दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात येणार असून, नायलॉन मांजा वापरणारा मुलगा अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकांना आणि सज्ञान असल्यास संबंधित व्यक्तीला 50 हजार रुपये, तर मांजा विक्रेत्यांना अडीच लाख रुपयांचा दंड का ठोठावण्यात येऊ नये, अशी विचारणा केली जाणार आहे. संबंधितांना सुनावणीची संधी देऊन ही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश
न्यायालयाने नायलॉन मांजाप्रकरणी आता पोलिस प्रशासनाची जबाबदारी निश्चित केली असून, ज्या क्षेत्रात अशा प्रकारची अनुचित घटना घडेल, त्या भागातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. या आदेशानुसार, 29 डिसेंबरपूर्वी सर्व पोलिस उपायुक्त व इतर संबंधित अधिकाऱ्यांना या कारवाईबाबत रीतसर सूचना देण्यात याव्यात आणि अशी कारवाई का केली जाऊ नये, याबाबत त्यांचे काही आक्षेप असल्यास त्यांना न्यायालयात आपली बाजू मांडण्याची संधी दिली जावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App