विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचा समाचार घेतला आहे. “काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असे दाखवत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राज-उद्धव यांच्या युतीची खिल्ली उडवली.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ठाकरे बंधू एकत्र आले याचा मला आनंदच आहे. पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काहीतरी घडेल असा जर कुणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. कुठल्याही एका पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावे लागते, त्या दृष्टीने दोन अस्तित्वहीन पक्षांनी केलेली ही युती आहे. या पलीकडे याचा कोणताही अन्वयार्थ काढण्याचे कारण नाही. या युतीने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे फडणवीस म्हणालेत.Devendra Fadnavis
मराठी आणि अमराठी लोकांचा विश्वासघात
फडणवीस म्हणाले, ठाकरे बंधुंच्या युतीने फार काही परिणाम होईल, असे देखील मला वाटत नाही. ज्याप्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींना सातत्याने केलाय. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे काम आणि पाप यांनी केलेल आहे. त्यामुळे मराठी माणुसही यांच्यासोबत नाही. ज्याप्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केलेत, ते देखील त्यांच्यासोबत नाहीत. मुंबईमध्ये कोणीही ठाकरे बंधुंच्या सोबत येणार नाहीत. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे. निवडणुका आल्यावर भाविनक बोलायचे, पण आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही.
मुंबईकरांचा महायुतीच्या विकासावर विश्वास
ठाकरे बंधूंनी अजून दोन-चार पक्ष सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. “मुंबईकरांनी महायुतीचा विकास पाहिलेला आहे. विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच हक्काची घरे देण्याचा कार्यक्रम महायुतीने हाती घेतला आहे. त्यामुळे मुंबईची जनता विकासाच्या मुद्द्यावर महायुतीलाच कौल देईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधू म्हणजे मुंबई नाही
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत, मराठी नाहीत. आपण म्हणजे सर्व काही असल्याचा त्यांचा गर्व आणि दुराभिमानामुळे मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेलेत. कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. राज्य गाजवणारे आणि स्वत:चा फायदा पाहणारे नको आहेत. ठाकरे बंधुंची युती म्हणजे प्रीतिसंगम नाही, तर भीतीसंगम आहे, असेही फडणवीस म्हणालेत.
उद्धव ठाकरे विकासावर बोलू शकत नाहीत
उद्धव ठाकरे विकासावर बोलले तर १ हजार रुपये मी देईन, अशी घोषणा मी मागच्या वेळेस केली होती. पण अजून माझे हजार रुपये वाचलेत. उद्धव ठाकरे विकासाची एकही गोष्ट बोलत नाहीत. आताची निवडणूक मुंबईच्या विकासाची आणि मुंबईकरांच्या हिताची आहे. त्यावर ते एक शब्द बोलत नाहीत, कारण ते बोलू शकत नाहीत. त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागेल. मिठी नदी, मराठी माणसाच्या घरांचा हिशोब द्यावा लागेल आणि तो हिशोब ते देऊ शकत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
आमचे हिंदुत्ववाद जनतेला मान्य
देवेंद्र फडणवीस हा हिंदुत्वात पैदा झाला आणि हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे, रोज मत बदलणारे आम्ही लोक नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे लोक हिंदुत्ववादापासून फारकत घेतील, लांगुलचालन करतील, त्यांची काय अवस्था होते, हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेले आहे. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार. आमचे हिंदुत्व जनतेने पाहिलेले आहे आणि त्यांना ते मान्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगू नये
आमचा हिंदुत्ववाद पुजा-पद्धतीवर आधारित नाही, भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आहे. या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा, भारतीस समाजाची मानके मानणाऱ्यांना, जसे की, प्रभु श्रीराम हे देव नाहीत, तर आमच्या संस्कृतीचे मानक आहेत. त्यामुळे प्रभू श्रीरामांना कुणी मानत असेल, तर त्याची जात-धर्म आम्ही पाहणार नाही. त्यांना आम्ही सोबत घेतलेले आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे, पण हिंदुत्व सोडणार नाही, सोडले नाही. त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App