नाशिक : लोकांची मते मिळवण्यासाठी “नैसर्गिक युती” आणि सत्ता भोगण्यासाठी “महायुती”!!, ही राजकीय दुटप्पी भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये समोर आली आहे. Shivsena + BJP + NCP
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी महायुती वेगवेगळ्या पद्धतीने मैदानात उतरली आहे. ही वेगवेगळी पद्धत म्हणजे ढोबळमानाने लोकांची मते मिळवण्यासाठी नैसर्गिक युती या स्वरूपाची आहे. 29 पैकी बहुतांश महापालिकांमध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असून हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू नये. आपली मूळची Vote Bank इतरत्र हलू नये, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.
हिंदुत्ववादाचा प्रभाव असणाऱ्या मुंबई ठाणे परिसरातील ९ महापालिका, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या अन्य काही महापालिका त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर या महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याचे ठरवून तशा वाटाघाटी देखील सुरू केल्या. त्यामध्ये जागा वाटपात खेचाखेची सुरू झाल्या, पण तरीही दोन्ही पक्षांचे प्रदेश पातळीवरचे नेते शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती करण्यावर भर देत आहेत. याचे एकमेव कारण हिंदुत्ववादी लोकांची मते फुटून ती इतरत्र जाऊ नयेत. त्याचा फटका दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांना बसू नये. त्याचबरोबर हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या परंतु प्रत्यक्षात काँग्रेस – राष्ट्रवादीची जुळवून घेणाऱ्या ठाकरे बंधूंना हिंदुत्ववादी मते मिळू नयेत, हे मुख्यत्वाने शिवसेना आणि भाजपचे हेतू आहेत.
– अजितदादांच्या राष्ट्रवादीला लोटले दूर
29 पैकी बहुतांश महापालिकांमध्ये अशी शिवसेना-भाजपची नैसर्गिक युती करताना दोन्ही पक्षांनी शक्यतो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर सारून त्यांना परस्पर शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आतून किंवा बाहेरून हातमिळवणी करण्याची संधी देऊन टाकली आहे. तशी ही पवार काका – पुतण्यांची ही नैसर्गिक आघाडीच होणार आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादींना आपापले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांमध्ये आतून किंवा बाहेरून एकत्र येणे भाग आहे. त्याच्याशिवाय दोन्ही महापालिकांमध्ये अस्तित्व टिकवायचे असेल, तर काका – पुतण्यांना त्याशिवाय पर्याय नाही. कारण राष्ट्रवादीला अनुकूल असणारी मते फुटणे दोन्ही पवारांना परवडणारे नाही.
– सत्ता भोगण्यासाठी मात्र एकत्र
पण एकीकडे लोकांच्या मतांसाठी अशा नैसर्गिक युत्या आणि आघाड्या करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतून आणखी एक दुटप्पी राजकीय व्यवहार समोर आला, तो म्हणजे त्यांना सत्ता उपभोगण्यासाठी एकत्र राहायचे आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कसेही करून राज्यात भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहायचे आहे. त्यामुळे भाजपने अजितदादांना कितीही रेटले, त्यांच्या पक्षाला निवडणुका लढवण्यासाठी महायुतीतून बाजूला सारले किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे कितीतरी घोटाळे बाहेर काढले, तरी ते चालवून घेण्याशिवाय अजितदादांना सध्या पर्याय नाही. म्हणून त्यांनी सुद्धा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये अपरिहार्यपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायला मान्यता दिली आहे आणि दुसरीकडे तेच अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसून राहण्यासाठी धडपडत आहेत.
शिवाय १६ तारखेला निकाल लागल्यानंतर सत्तेच्या गरजेनुसार कुणाशीही युती किंवा आघाडी करून सत्तेच्या खुर्च्या मिळवायला सगळ्या पक्षांना संधी ठेवली आहेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App