MGNREGA अर्थात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचे नामांतर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने नवी विकसित भारत ग्रामीण रोजगार योजना VB – G RAM G मांडली. पण ती मांडताना पंतप्रधान मोदींनी जी राजकीय चतुराई केली आणि जे राजकीय जाळे निर्माण केले, त्यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि बाकीचे विरोधक बरोबर अडकले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेला विरोध सुरू केला. त्यासाठी हातात महात्मा गांधींचे फोटो पकडून त्यांनी संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार गदारोळ केला.
त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी भले मोठे ट्विट करून पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेचे जोरदार वाभाडे काढले. मोदींच्या मनात महात्मा गांधी बद्दल द्वेष आहे. महात्मा गांधी ग्रामीण विकास योजना बंद करण्यासाठीच मोदींनी नव्या योजनेची टूम काढलीय, असा आरोप प्रियांका गांधींनी लोकसभेत केला. त्या पाठोपाठ राहुल गांधींनी तो त्या ट्विटमध्ये केला. त्याचवेळी त्यांनी देशभर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
पण विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेला राहुल गांधींनी देशभर आंदोलन करून विरोध करणे नेमके हेच मोदींच्या राजकीय जाळ्यात अडकल्याचे चिन्ह ठरलेय.
– मोदींनी मारली पाचर
रोजगार योजनेतले महात्मा गांधींचे नाव काढून मोदींनी विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले. पण त्या पलीकडे जाऊन मोदींनी मांडलेल्या विकसित भारत रोजगार योजनेतली राजकीय पाचर जी आहे, त्यामुळे विरोधक पुरते अडकलेत. महात्मा गांधी रोजगार योजनेत ९० % पैसा केंद्राकडून जात होता उर्वरित १० % पैसा राज्यांना द्यावा लागत होता. त्या उलट आता विकसित भारतीय ग्रामीण रोजगार योजना चालविताना ६० % पैसा केंद्र सरकार देईल उर्वरित ४० % पैसा राज्य सरकारांना द्यावा लागेल. याचा अर्थच राज्य सरकारांना आता केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर मजा मारता येणार नाही. आपल्या राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील, तर स्वतःच्या तिजोरीत हात घालावा लागेल आणि इथेच राहुल गांधी प्रियांका गांधी आणि बाकीच्या विरोधकांची पोटदुखी बाहेर आलीय. म्हणूनच त्यांनी मोदींच्या नव्या योजनेला विरोध सुरू केलाय. राज्य सरकारांची आर्थिक हालत आधीच खस्ता असताना विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेसाठी राज्य सरकारे ४० % रक्कम कुठून आणणार??, असा सवाल करून प्रियांका गांधींनी मोदी सरकारवर आगपाखड केलीय. तोच मुद्दा राहुल गांधींनी पुढे करून विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेविरुद्ध देशभर आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन टाकला.
– उत्पन्न वाढीचा मार्ग
पण मोदींनी योजनेत अत्यंत चतुराईने १०० दिवसांना ऐवजी १२५ दिवस रोजगाराचा हक्क ग्रामीण मजूर आणि कामगारांना नव्या योजनेतून दिला. त्यांना उत्पन्न वाढीचे नवे रस्ते उघडून दिले. आता या योजनेला जर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि बाकीच्या विरोधकांनी विरोध केला, या योजनेच्या विरोधात देशव्यापी आंदोलन उभे केले, तर मोदींच्या हातात विरोधकांना ठोकून काढायचे नवे हत्यार मिळेल. ग्रामीण भागातल्या मजुरांना आमचे सरकार जास्ती दिवस रोजगाराची संधी देत असताना, त्यांचे उत्पन्न वाढवणार असताना विरोधक मात्र विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेला विरोध करत आहेत. याचा अर्थच ते मजूर आणि कामगारांचा हक्क मारत आहेत, असा आरोप करायची मोदींना आयती संधी मिळेल.
– योजना तर मंजूर होईलच, पण…
तसेही लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातल्या बहुमतांच्या आधारे मोदी विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेचे विधेयक मंजूर करून घेतील. ती योजना भाजपशासित सर्व राज्यांमध्ये अंमलात आणायला लावतील. त्याचवेळी काँग्रेस शासित किंवा बाकीच्या विरोधी पक्ष शासित राज्यांनी ती योजना लागू केली नाही, तरीसुद्धा मोदींसकट सगळे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते देशभर काँग्रेसच्या आणि बाकीच्या विरोधकांच्या नावाने धुमाकूळ घालतील. त्यांना रोजगार विरोधी, कामगार विरोधी, मजूर विरोधी ठरवून मोकळे होतील.
– मते गमावण्याची विरोधकांना भीती
महात्मा गांधींच्या नावाची योजना बदलल्यामुळे मोदींच्या भाजपवर किंवा त्यांच्या मतदारांवर काही फरक पडणार नाही. पण विकसित भारत ग्रामीण रोजगार योजनेला जर विरोध केला, तर काँग्रेस सकट बाकीच्या विरोधकांना स्वतःची गरिबांची Vote Bank गमावण्याची भीती निर्माण होईल हे मात्र निश्चित!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App