विशेष प्रतिनिधी
मुंबई : Election Commission राज्याच्या प्रलंबित महापालिका निवडणुकांचा विषय आज मार्गी निघाला. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयोगावर होणाऱ्या चौफेर टीकेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुबार मतदारांचा पायबंद करण्यासाठीही काही ठोस निर्णय घेतलेत.Election Commission
नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.Election Commission
‘जातवैधता पडताळणी’बाबत
ते पुढे म्हणाले, राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. “सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल,” असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.
मतदान केंद्र आणि ईव्हीएम
आयोगाच्या माहितीनुसार, महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
संभाव्य दुबार मतदारांबाबत दक्षता
वाघमारे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही; परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची (इमारती) यादी 20 डिसेंबर 2025 रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 27 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर कार्यवाही करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन) विकसित केली आहे. इतरही महानगरपालिकांनी विविध तंत्रांचा वापर करून संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेतली आहे.
महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी केली आणि त्यांच्याकडून असा मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App