विशेष प्रतिनिधी
नागपूर : Yogesh Kadam मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील लहान मुले पळवण्याच्या टोळ्यांबाबत आणि लहान मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच या प्रकरणी विधिमंडळात चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या या पत्राला आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले आहे.Yogesh Kadam
योगेश कदम म्हणाले की, राज ठाकरे यांनी काय पत्र लिहिले मला माहिती नाही. पण लहान मुले अचानक हरवण्याच्या काही बातम्या आम्ही देखील पाहिल्या आहेत. मी या ठिकाणी एक आवर्जून सांगतो की जेव्हा लहान मुले हरवतात. तेव्हा त्यांचा तपास करण्यासाठी आपण विशेष तपास योजना राबवतो. या विशेष मोहिमांच्या दरम्यान हे लक्षात येते की अनेकांच्या मिसिंग तक्रारी दाखल नसतानाही त्यांना आपण शोधून काढले आहे.Yogesh Kadam
मुलांना शोधण्यासाठी प्रयत्नशील
योगेश कदम म्हणाले की, अल्पवयीन मुलं जेव्हा हरवतात किंवा बेपत्ता होतात त्यांचा तपास करण्यासाठी आपण विशेष मोहिम राबवतो. या मोहिमेत 90 टक्क्यापेक्षा जास्त मुलं-मुली आपल्याला सापडतात. परंतू याचा अर्थ असा नाही की 10 टक्के मुलांना आम्ही शोधत नाही. काही अल्पवयीन मुलं-मुली यांना शोधण्याची आपल्या टीम काम करतात असे असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. या विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष दिलेले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत बेपत्ता मुलांचा शोध घ्यावा असे निर्देश दिले आहेत.
राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र देखील वाचा….
प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही…
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
राज ठाकरे ।
सरकार आकडे लपवतंय- आ. अहिर
मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता झाल्या आहेत हे शोभनीय नाही. मुंबई सारख्या शहरातून जर हे होत असेल तर महाराष्ट्रामधील नागरिकांमध्ये भीतीचे काय वातावरण आहे हे आपल्याला कळेल, हे सर्व रॅकेट आहे. सरकार विरोधकांवर आमदारांवर कारवाई करत असताना ही गँग कधी मोडणार आहे. या गँगबद्दल सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे, ते पकडले जातात आणि बेलवर बाहेर येतात. यावर काही कारवाई होणार का नाही? असा सवाल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App