विशेष प्रतिनिधी
नागपूर : Ravi Rana, राज्यात सध्या बिबट्यांचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त्यामुळे निर्माण झालेली दहशत हा चिंतेचा विषय ठरला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही या मुद्द्यावर गंभीर चर्चा सुरू असतानाच, सत्ताधारी पक्षाचे समर्थक आमदार रवी राणा यांनी या समस्येवर एक अजब तोडगा सुचवला आहे. “बिबट्यांना थेट ‘पाळीव प्राण्या’चा दर्जा द्यावा,” अशी मागणी रवी राणा यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. एवढेच नव्हे तर, परवानगी मिळाल्यास आपण स्वतः दोन बिबटे पाळायला तयार असल्याचेही राणा यांनी जाहीर केले आहे.Ravi Rana,
यासंदर्भात विधिमंडळात बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, आज विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्येही बिबट्याचाच विषय चर्चेत आहे. प्रसारमाध्यमांमध्येही बिबट्याचाच विषय दिसून येत आहे. अमरावतीमध्येसुद्धा बिबट्यांचा वावर आहे. नागपूर असो, मुंबई असो शहरी भागात ज्याप्रमाणे बिबटे येत आहेत ते पाहता आता बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला पाहिजे. यासंदर्भात मी स्वत: आज वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेतली. तसेच बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा, अशी मागणी मी केल्याचे रवी राणा यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले.Ravi Rana,
आज तुम्ही अनेक घरात पाहिले तर तिथे खतरनाक जातीचे कुत्रे पाळले जात आहेत. त्यापेक्षा जर आपण बिबट्यांचे लहानपणापासून पालन केले, तर बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील आणि माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणावर नसबंदी करायची आवश्यकता भासणार नाही, असा प्रकारचा सल्ला मी वनमंत्री गणेश नाईक यांना दिल्याचेही रवी राणा यांनी यावेळी सांगितले.
‘वनतारा’ आणि बाबा आमटेंचा दाखला
आपल्या मागणीचे समर्थन करताना रवी राणा यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या ‘हेमलकसा’ प्रकल्प आणि अंबानी कुटुंबाच्या ‘वनतारा’ प्रकल्पाचे उदाहरण दिले. “बाबा आमटे यांनी त्यांच्याकडील वनांमध्ये बिबटे आणि वन्यजीव मुलांप्रमाणे सांभाळले. अंबानींनी वनताराच्या माध्यमातून वन्यजीवांचे रक्षण केले. त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात असे प्रकल्प उभे राहणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
…तर पहिली दोन बिबटे मी पाळीन
सरकारने जर बिबटे पाळण्यास परवानगी दिली आणि तसा कायदा केला, तर सर्वात आधी आपण पुढाकार घेऊ, असे राणा म्हणाले. “जर परवानगी मिळाली, तर एक आमदार म्हणून मी स्वतः दोन बिबटे दत्तक घेऊन त्यांचे संपूर्ण पालनपोषण करण्यास तयार आहे. माझ्याप्रमाणेच ज्यांना वन्यजीव प्रेमापोटी बिबटे पाळण्याची इच्छा आहे, त्यांना सरकारने परवानगी द्यावी,” असेही रवी राणा यांनी यावेळी सांगितले. बिबट्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त असताना लोकप्रतिनिधीने केलेल्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App