विशेष प्रतिनिधी
नाशिक : Anna Hazare ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी लोकायुक्तांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धीतील यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अण्णांनी तपोवनातील वृक्षतोडीलाही विरोध दर्शवला आहे.Anna Hazare
नाशिक येथील वृक्ष तोडीवर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत. फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावीत. मात्र, मोठ्या झाडांना तोडू नये, अशी माझी विनंती असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.Anna Hazare
अण्णा हजारे उपोषणाला बसणार
अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रात लोकाआयुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आपण उपोषण करणार असल्याचे सांगत उपोषणाची तारीखही जाहीर केली आहे. राज्य सरकाकडून लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात ते उपोषण करणार आहेत.
केंद्राचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक शहरात विकासकामांचा धडाका सुरू असताना, तपोवन परिसरातील प्रस्तावित मलनिस्सारण केंद्राचा प्रकल्प आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासनाने 300 हून अधिक डेरेदार झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. विकासाच्या नावाखाली होत असलेल्या या बेसुमार वृक्षतोडीमुळे तपोवनातील जैवविविधता आणि नैसर्गिक समतोल ढासळण्याची भीती व्यक्त केली जात असून, पर्यावरणवाद्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एकीकडे साधुग्राम परिसरातील 1800 झाडांच्या कत्तलीचा वाद अद्याप प्रलंबित असतानाच, आता नवीन एसटीपी प्लांटसाठी झालेली ही वृक्षतोड आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने आपली बाजू मांडताना, या प्रकल्पासाठी 447 झाडे तोडण्याची अधिकृत नोटीस दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या दाव्यानुसार, मंजूर संख्येतील 300 झाडे तोडण्यात आली असून उर्वरित झाडे वाचवण्यात यश आले आहे. मात्र, प्रशासनाच्या या स्पष्टीकरणानंतरही पर्यावरणप्रेमींचे समाधान झालेले नसून त्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पायाभूत सुविधांची कामे वेगाने मार्गी लावली जात असली, तरी त्याला पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये, अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींनी घेतली आहे. हिरवाईने नटलेल्या तपोवनसारख्या भागात अशा प्रकारे झाडांची कत्तल झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान भरून न येणारे असल्याने, प्रशासनाने विकासासोबतच निसर्ग संवर्धनाचे भान राखावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App