विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात आयुष्य वेचलेले, हमाल–रिक्षाचालकांचे आधारस्तंभ, ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीचे प्रणेते आणि समाजवादी विचारसरणीचे अजोड मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री 8.25 वाजता पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी हे प्रवासपर्व संपले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचा एक जिवंत पुरोगामी आवाज कायमचा हरपला आहे.
मागील काही महिन्यांपासून बाबा आढाव वार्धक्य आणि वैद्यकीय गुंतागुंतींशी मुकाबला करत होते. 10 ते 12 दिवसांपूर्वी प्रकृती गंभीर बिघडल्याने त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर्सच्या पथकाने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू ठेवले. परंतु अखेर उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
समाजातील विषमता मोडून काढण्यासाठी त्यांनी 1970 च्या दशकात उभारलेली ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचा आधारस्तंभ ठरली. जातीभेदाच्या रेषा पुसून सहअस्तित्व शिकवणारी ही मोहीम त्यांच्या नावासोबत कायम कोरली गेली आहे.
पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून सार्वजनिक आयुष्याची सुरुवात करताना त्यांनी समाजवादाला प्रत्यक्ष कामातून आकार दिला. हमालांच्या हक्कांसाठी उभारलेली हमाल पंचायत, रिक्षाचालकांसाठी स्थापन झालेली रिक्षा पंचायत, कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे त्यांच्या संघटनात्मक कार्याने हजारो कुटुंबांना न्याय मिळवून दिला.
वयाच्या 93 व्या वर्षीही त्यांच्या आंदोलनशीलतेची धार कमी झाली नव्हती. राज्यातील राजकीय फुटी, सत्ताकेंद्रित संस्कृती आणि नैतिकतेचा ऱ्हास याविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. “नेते सकाळी एका बाजूला, संध्याकाळी दुसऱ्या बाजूला दिसू लागले आहेत; आता 140 कोटी जनता ठरवेल,” अशी त्यांची तिखट टीका आजही स्मरणात आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या व राष्ट्रनिर्मितीच्या लढ्यात बाबा आढाव यांनी दाखवलेले अपार कष्ट, तडफदार भूमिका, तडजोड न करणारी वृत्ती आणि सामान्य माणसासाठीची निष्ठा हा काळाच्या ओघातही अढळ राहील, अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे.बाबा आढाव यांचे जाणे म्हणजे समाजवादी विचार, संघर्षशीलता आणि मानवी समतेच्या लढ्याचे एक युग संपणे आहे, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App