कोलकाता : एरवी मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या ममता बॅनर्जींनी सुद्धा बाबरीची धास्ती घेतली. पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची त्यांनी तृणमूळ काँग्रेस मधून हकालपट्टी करून टाकली. या कारवाईतून ममता बॅनर्जी यांनी नवा राजकीय डाव टाकला. Mamata banerjee
पश्चिम बंगाल मधल्या तृणमूळ काँग्रेसचे आमदार हूमायून कबीर यांनी बेलडांग मध्ये बाबरी मशीद बांधायची घोषणा केली. त्यावरून राज्यात बरेच राजकारण तापले. ममता बॅनर्जींना घेरायचा आयता मुद्दा भाजपच्या हाताला लागला. आपण कितीही मुस्लिम तुष्टीकरण करत बसलो आणि मुस्लिमांना झुलवत बसलो, तरी बाबरी मशिदीचा मुद्दा आपल्या पक्षावर शेकू शकतो, याची भीती ममता बॅनर्जींना वाटताच त्यांनी आमदार हुमायून कबीर यांच्यावर कारवाई केली. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
पक्षातले मुस्लिम नेते फरहीद हकीम यांनी हुमायन कबीर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. हुमायून कबीर राहतात राजनगर मध्ये. भरतपूरचे ते आमदार आहेत. मग मशीद बांधायची, तर बेलडांग मध्ये कशाला?? हुमायून कबीर यांच्याकडे बरेच पैसे असतील तर त्यांना मशीदच का बांधायची आहे??, त्यांनी दुसरे काही का बांधू नये??, असे सवाल करून हकीम यांनी भाजपला उलटे धारेवर धरले. बाबरी मशिदीचा मुद्दा तापविण्यासाठी भाजपनेच डाव खेळल्याचा दावा आणि आरोप त्यांनी केला.
आपल्या हाकालपट्टीच्या मुद्द्यावर आमदार हुमायन कबीर चिडले. त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. मुर्शिदाबाद मधल्या रॅलीत मला बोलवून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी माझा अपमान केला. त्याच्यामागे पक्षातल्याच नेत्यांनी माझ्याविरुद्ध कट रचला. पण मी बाबरी मशीद बांधणारच आहे. मी पक्षाचा नंतर राजीनामा देईन, असे हुमायन कबीर यांनी जाहीर केले.
पण ते काही असले तरी पश्चिम बंगाल मधला भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन बाबरी मशिदीचा मुद्दा आपल्याला घातक ठरू शकतो हे ममता बॅनर्जींनी लक्षात घेतले आणि त्यामुळेच आमदार हुमायन कबीर यांची तृणमूळ काँग्रेस मधून हाकालपट्टी केली.
– ममतांचा राजकीय डाव
अर्थात ममता बॅनर्जी यांचा हा मोठा राजकीय डाव सुद्धा असू शकतो. बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची हकालपट्टी केली, असे दाखवून आपली हिंदू प्रतिमा जनमानसात उजळविण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. 2021 मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी अशीच आपली हिंदू प्रतिमा जनमानसात उजळवली होती. त्यांनी निवडणुकीच्या आधी प्रत्येक देवळात जाऊन विविध देवतांची दर्शने घेतली होती. आपण पश्चिम बंगाल मधल्या कायस्थ ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्याचे वारंवार सांगितले होते.
त्याचप्रमाणे बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराला एकीकडे पक्षातून हाकलायचे. त्याला स्वतंत्र पक्ष काढण्यासाठी “आतून” मदत करायची. आपल्या तृणमूळ काँग्रेस पक्षाची प्रतिमा हिंदू समाजात उजळवायची. हिंदूंची भाजपकडे वळू शकणारी मते कापायची आणि प्रत्यक्ष निवडणुकीनंतर हुमायून कबीर यांच्या नव्या पक्षाशी जुळवून घ्यायचे, असा राजकीय डाव ममता बॅनर्जी खेळू शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App