विशेष प्रतिनिधी
पुणे : Sheetal Tejwani पुण्यातील पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल किसनचंद तेजवानी हिला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे नाव समोर आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असतानाच तिला बेड्या ठोकल्याने तपासाला वेग येणार आहे..Sheetal Tejwani
मुंढवा येथील जमिनीच्या व्यवहारात शासनाची मोठी फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या व्यवहारात शीतल तेजवानीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना शीतल तेजवानी हिचा मुख्य सहभाग असल्याचे धागेदोरे मिळाले होते. पोलिसांनी यापूर्वी तिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मिळालेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर तिचा गुन्ह्यातील थेट सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर गुन्हे शाखेने तत्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत तिला अटक केली.Sheetal Tejwani
देश सोडून गेल्याची होती अफवा
शीतल तेजवानी या प्रकरणातील कारवाई टाळण्यासाठी देश सोडून परदेशात पळून गेल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू होती. मात्र, पुणे पोलिसांनी तिला अटक करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आता पोलीस कोठडीत तिच्याकडून या घोटाळ्याशी संबंधित आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमके प्रकरण काय?
मुंढवा येथील तब्बल 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, या कोट्यवधींच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून अवघे 500 रुपये मोजण्यात आले होते. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीसाठी हा व्यवहार झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या कंपनीचे भांडवल केवळ एक लाख रुपये आहे, ती कंपनी तीनशे कोटींचा व्यवहार कसा करू शकते, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. प्रशासकीय पातळीवरही या व्यवहाराला प्रचंड गती देण्यात आली होती. उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली होती आणि अवघ्या 27 दिवसांत हा संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यात आला होता.
शीतल तेजवानीवर आरोप काय?
महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. शीतल तेजवानी आणि मूळ मालक गायकवाड कुटुंब आरोपांच्या घेऱ्यात आहे. शीतल तेजवानी ही जमीन गैरव्यवहारातील बडा मासा आहे. बनावट कागदपत्र तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जमिनीचे बोगस कागदपत्र कुणी तयार केले असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 2014 ला न्यायालयाने तेजवाणी, मूळ मालकांचा दावा फेटाळला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App