राष्ट्रवादीतल्या “दादा” लोकांना भाजपने केले “सरळ”; स्थानिकच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीतच आणले गुडघ्यांवर!!

राष्ट्रवादीतल्या “दादा” लोकांना भाजपने केले “सरळ”; स्थानिकच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीतच आणले गुडघ्यांवर!!, असे राजकीय चित्र नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या काही विशिष्ट जिल्हे आणि शहरांच्या अंतर्गत राजकारणातून समोर आले. Devendra fadnavis

शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीतून नेहमीच स्थानिक पातळीवरचे “दादा” लोक तयार केले गेले. या “दादा” लोकांनी आपापल्या गावांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये वाटेल तशा तडजोडी करायच्या आणि वर्चस्व राखायचे अशी राजकीय संस्कृती शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाखाली रुजवली, वाढवली आणि फोफावली होती. शरद पवारांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानाच्या नावाखाली स्वतःचे वर्चस्व टिकवणाऱ्या नेत्यांचा एक गठ्ठा बनला होता. त्याचा “पक्ष”
या संकल्पनेशी काही संबंधच नव्हता. तीच अवस्था अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा आहे. कारण स्वतंत्र राजकीय संस्कृती विकसित करण्यात पण अजितदादा मोठे नेते नाहीत. त्यामुळे पवारांच्या पेक्षा त्यांचे संस्कार वेगळे नाहीत.

पण पवार काका पुतण्यांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या “दादा” लोकांना भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातल्याच निवडणुकांमध्ये गुडघ्यावर आणले. कोल्हापूर, सातारा आणि कल्याण डोंबिवली मधून हे चित्र ठळकपणे समोर आले. या तिन्ही शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये एकमेकांचे जुने वैरी राहिलेले दादा लोक भाजपने त्यांच्या शेपट्या पिरगळून एकत्र आणले किंबहुना त्यांना एकत्र येणे भाग पाडले.



– कल्याण डोंबिवलीतले वैरी एकत्र

कल्याण डोंबिवलीत म्हात्रे कुटुंब आणि गायकवाड कुटुंबीय एकमेकांचे कट्टर वैरी होते, पण आता हेच भाजपच्या झेंड्याखाली मुकाट्याने एकत्र नांदण्याची परिस्थिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केली. म्हात्रे कुटुंबीय आणि गायकवाड कुटुंबीय यांचे राजकारण पुढे चालवायचे असेल, तर त्यांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही, अशी तंबी फडणवीस आणि चव्हाण या दोन्ही नेत्यांनी दिली. त्यामुळे दीपेश म्हात्रे मुकाट्याने भाजपमध्ये आले. आणि गायकवाड कुटुंबीयांना त्यांना सांभाळून घ्यावे लागले.

– सातारा जिल्ह्यातले “दादा” लोक “सरळ”

सातारा जिल्ह्यातले दोन्ही राष्ट्रवादींचे “आबा” “दादा” लोक भाजप पुढे असेच “सरळ” झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना सातारा जिल्ह्यातील एवढे वर्चस्व होते, की ते बाकीच्या पक्षांना विचारत नव्हते. सातारा जिल्ह्यातल्या नऊ नगरपरिषद आणि पंचायती लढवताना राष्ट्रवादीला भाजपबरोबर तडजोड करावी लागली. ज्या नगरपरिषद आणि पंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व होते, ते वर्चस्व भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्याबरोबर तुटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीला तिथे भाजपशी जुळवून घ्यावे लागले. अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्ह्यातल्या नऊ पैकी फक्त तीन पालिकांमध्ये संपूर्ण पॅनल टाकू शकली. वाई, महाबळेश्वर आणि रहिमतपूर या तीन नगरपरिषदांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सगळ्या वॉर्डांमध्ये उमेदवार मिळाले पण अन्य सहा पालिकांमध्ये त्यांच्या पक्षाचे संपूर्ण पॅनल उभे करण्याची क्षमताच राहिली नाही. त्यांना 6 पालिकांमध्ये भाजपशी तडजोड करावी लागली.

– अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला सुरुंग

महायुतीच्या सत्तेमध्ये जाऊन आपण आपला पक्ष वाढवू अशी महत्त्वाकांक्षा अजित पवार यांनी बाळगली होती, पण प्रत्यक्षात त्यांची दादागिरी चालणाऱ्या जिल्ह्यांमध्येच राष्ट्रवादीच्या एकतर्फी वर्चस्वाला भाजपने चतुराईने सुरुंग लावला. याच पालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तर एवढी बिकट झाली, की त्यांना एकही पालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनल उभे करायला सक्षम उमेदवारच मिळाले नाहीत. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना स्वतःच्या सातारा जिल्ह्यात नगर परिषदांमध्ये अध्यक्ष पदाचे उमेदवार शोधताना दमछाक झाली. त्यांना एकाही ठिकाणी सक्षम उमेदवार मिळू शकला नाही. शशिकांत शिंदे हे फक्त सातारा वाई आणि मेढ्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे करू शकले.

– मुश्रीफ + घाटगेंना केले “सरळ”

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मध्ये हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे या दोन कट्टर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेपट्या पिरगळून एकत्र आणले. स्थानिक राजकारणात एकमेकांच्या विरोधात वैऱ्यासारखे वावरलेले हे दोन नेते मुकाट्याने एकत्र आले किंबहुना त्यांना एकत्र यावे लागले अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांनाही “सोडले” नसते, याची भीती निर्माण झाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले. कागल, चंदगड मध्ये एकत्र येऊन पॅनेल उभे केले. एकेकाळी कुठल्याही पक्षात राहून घाटगे परिवार स्वतःचे राजकारण पुढे रेटत राहिला होता. पण आता त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर आपल्या राजकीय वैऱ्याशी म्हणजेच हसन मुश्रीफ यांच्याशी जुळवून घ्यावे लागले. हसन मुश्रीफ जरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असले, तरी त्यांच्यावर आता देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण वर्चस्व आहे कारण मुश्रीफ यांना ED ची भीती आहे. नवाब मलिकांचे उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे. फडणवीसांचे न ऐकता आपण स्वतःचेच राजकारण पुढे रेटले, तर आपल्याला चुकवावी लागणारी राजकीय आणि कायदेशीर किंमत फार मोठी असेल किंबहुना आपले राजकारण कायमचे संपुष्टा आणणारी असेल, याची साधार भीती हसन मुश्रीफ यांना वाटते म्हणूनच त्यांच्यासारखा ‘”दादागिरी” करणारा नेता भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर आला आहे.

– पवार काका – पुतण्यांना मुकाट्याने पाहावे लागते

एरवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना त्यांचे राजकारण साधून घ्यायची मुभा देत असत. किंबहुना त्यांना दुसरा पर्यायही नव्हता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये “दादा” संस्कृती निर्माण झाली. पण भाजपमध्ये ही संस्कृती नाही भाजपमध्ये “वरून” सांगितले की खालून “सरळ” चालायला लागते, ही संस्कृती आहे त्यामुळे भाजपने विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी 2029 वर नजर ठेवून ज्या सगळ्यांना सरळ केले, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे “दादा” नेते त्यांच्या सपाट्यात आले. शरद पवार आणि अजित पवार यांना हे सगळे मुकाटपणे पाहावे लागत आहे. कारण त्यांचेही हात मोठ्या दगडाखाली अडकले आहेत.

Devendra fadnavis brought down in NCP to the knees

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात