विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uday Samant उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त जोरकसपणे फेटाळले आहे. एकनाथ शिंदे स्वतः मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. त्यामुळे शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आम्ही आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार? असा उलट सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.Uday Samant
शिवसेनेने भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप केला आहे. या मुद्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा दावा केला जात आहे. आजच्या बैठकीनंतर मंत्री गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले आदी मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयी तक्रार केली. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असताना मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी स्थिती स्पष्ट करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.Uday Samant
काय म्हणाले उदय सामंत?
उदय सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या बैठकीला हजर होते. पण माझ्यासह शंभूराज देसाई, संजय राठोड, योगेश कदम यांच्यासह काही मंत्र्यांना त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला हजर राहता आले नाही. त्यामुळे माध्यमांना सूत्रांनी दिलेली माहिती चुकीची आहे.
पत्रकारांनी यावेळी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीविषयी प्रश्न केला. त्यावर उदय सामंत यांनी या भेटीत काहीही नवे नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही आमची गाऱ्हाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार? आम्ही एकतर मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो किंवा आमचे नेते एकनाथ शिंदे यांना सांगू शकतो. त्यात काहीही गैर नाही, असे ते या प्रश्नाला बगल देताना म्हणाले.
बावनकुळेंनीही फेटाळले नाराजीचे वृत्त
दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महायुतीत कोणतीही नाराजी नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. महायुतीत कोणतीही नाराजी नाही. कोणताही मंत्री नाराज नाही. एकनाथ शिंदे स्वतः बैठकीला हजर होते. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. भाजपचे 8 मंत्रीही आपापल्या जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून या बैठकीला गैरहजर होते. शिवसेना व राष्ट्रवादीचे मंत्रीही आपापल्या भागात आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीला मंत्र्यांची संख्या कमी होती. दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे ते गैरहजर नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App