विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला या चौकशीतून वाचवा, अशी विनवणी करत, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोर लोटांगण घातल्याचा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. मोठा घातपात घडवून आणल्याचा कट असतानाही सरकार मुंडेंना ‘क्लीन चीट’ देणार असेल, तर हा अत्यंत वाईट प्रकार असून आपला या ‘नालायक’ सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार ११ दिवसांपूर्वी उघडकीस आला. जरांगे पाटलांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. “माझ्या हत्येची सुपारी आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे” असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. तर धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत, नार्को टेस्ट करून चौकशीला सामोरे जाण्याचे आव्हान जरांगेंना दिले होते. मनोज जरांगेंनी देखील हे आव्हान स्वीकारले होते. आता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंबाबत उपरोक्त मोठा गौप्यस्फोट केलाय.Manoj Jarange
नेमके काय म्हणाले मनोज जरांगे?
धनंजय मुंडे बोलून बाजूला होऊन जातात. आमिष दाखवून, ब्रेन वॉश करून, तरुणांना गुन्हेगारी वळवतात आणि कट घडवून आणतात, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. मला या चौकशीपासून लांब ठेवा, मी चौकशीला सामोरे गेलो, तर मराठा समाजाचे लोक मारतील, असे मुंडेंनी अजित पवारांना दिवसांपूर्वी भेट घेऊन सांगितले, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
मोठा घातपात घडवून आणत असताना, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंना क्लीन चीट देणार असतील, तर ही वाईट गोष्ट आहे. इतके नालायक सरकार मी आतापर्यंत कधीच बघितले नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील
धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची नुकतीच भेट घेतल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. मागील दोन वर्षांत आम्हाला मिळालेल्या सर्व माहिती खऱ्या झालेल्या आहेत. एका विद्रोही, नीच प्रवृत्तीच्या माणसाला सरकार वाचवणार असेल, तर ही साधी गोष्ट नाही. याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
आम्हाला तुमचे पोलिस संरक्षण नको
आम्ही उद्या-परवा सरकारने दिलेले पोलिस संरक्षण नाकारणार आहोत. त्यासाठी आम्ही स्वत: अर्ज करणार असून, तुमचे संरक्षण आम्हाला नको. कारण आता तुमच्यावर आमचा विश्वासच राहिला नाही. फडणवीसांनी आम्हाला दिलेले सर्व संरक्षण काढून घ्यावे. माझे रक्षण करायला मी समर्थ आहे. माझा मराठा समाज माझ्यामागे उभा आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठिशी घालून तुम्ही सरकार चालवणार आहात का? असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App