नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजी नगरात जाऊन मराठवाड्यात निवडणूक पूर्व राजकीय पेरणी केली. त्यांनी बीड मधल्या योगेश क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. त्याचबरोबर काँग्रेसने ज्यांचा वारसा अभिमानाने सांगायला पाहिजे त्या दोन नेत्यांच्या पुतळ्यांचे अनावरण करून देवेंद्र फडणवीस यांनी तो वारसा अलगदपणे भाजपशी जोडून घेतला. तिथे त्यांनी बंजारा समाजाचा मेळावा सुद्धा घेतला.
देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेते रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्याचबरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याही पुतळ्याचे अनावरण केले. रामानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्ती संग्रामातील प्रमुख नेते होते. ते तिथल्या काँग्रेसचे अध्वर्यू होते, तर वसंतराव नाईक हे काँग्रेसचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले महाराष्ट्रातले प्रमुख नेते होते.
पण काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांच्या पुतळ्यांच्या अनावरणाच्या कार्यक्रमात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचेच नेते पुढे दिसले. पण काँग्रेसचे कुठलेच बडे नेते अथवा स्थानिक नेते या कार्यक्रमांच्या दिशेने फिरकले सुद्धा नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांनी रामानंद तीर्थ आणि वसंतराव नाईक यांचा वारसा वाऱ्यावर सोडून दिला होता, पण तो भाजपने मात्र अलगद पकडला.
– वसंतराव नाईक यांचा वारसा काँग्रेसने सोडला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर मध्ये वेगवेगळ्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यात भाजप कार्यालयाचे उद्घाटन कमल तलावाचे उद्घाटन हे कार्यक्रम होते. त्याचवेळी एक महत्त्वाचा कार्यक्रम छत्रपती संभाजी नगरात झाला, तो म्हणजे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण!! देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्यांच्या भोवती भाजप आणि शिवसेनेचे सगळे नेते झाडून हजर राहिलेले दिसले. यामध्ये पंकजा मुंडे, अतुल सावे, संजय शिरसाट, संदिपान भुमरे, डॉ. भागवत कराड आदी नेत्यांचा समावेश होता. अर्थात हे नेते उपस्थित राहणे अपेक्षितच होते, कारण थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच छत्रपती संभाजी नगरातले सगळे कार्यक्रम होते.
पण वसंतराव नाईक यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात काँग्रेसचे कुठलेच बडे नेते तिथे फिरकलेले दिसले नाहीत. वास्तविक वसंतराव नाईक महाराष्ट्र काँग्रेसचे अनेक वर्षे मोठे नेते राहिले. त्यांनी सर्वाधिक काळ सलग म्हणजे तब्बल 11 वर्षे काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम पाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दोन विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यामध्ये पक्षाने स्वबळावर प्रचंड बहुमत मिळविले होते. 1972 च्या दुष्काळात वसंतराव नाईक यांनी दिवसरात्र एक करून महाराष्ट्राला दुष्काळाच्या बाहेर काढले विधान परिषदेचे त्यावेळेस सभापती वि. स. पागे यांनी तयार केलेली रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सगळीकडे अमलात आणली जिचा देश पातळीवर गौरव झाला. ही योजना अंमलात आणण्यात वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा होता. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती केली म्हणून त्यांच्या नावाने राज्य शासनाचे अनेक पुरस्कार दिले गेले. सगळ्या महाराष्ट्राने त्यांना हरितक्रांतीचे जनक म्हणून गौरविले.
– काँग्रेसचे नेते गैरहजर
पण काँग्रेसनेच त्यांचा हा मोठा वारसा छत्रपती संभाजीनगर मध्ये तरी सोडून दिल्याचे उघड झाले. कारण त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात सगळे भाजप आणि शिवसेनेचे नेते त्या पुतळ्याभोवती उभे राहिलेले दिसले, पण काँग्रेसचा एकही स्थानिक किंवा बडा नेता त्या कार्यक्रमाला हजर राहिलेला. दिसला नाही. वसंतराव नाईक यांचा वारसा काँग्रेसने सोडला पण भाजपने बरोबर स्वीकारला हेच राजकीय चित्र छत्रपती संभाजीनगर मधून सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App