विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shiv Sena शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत आज अखेर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरूवात झाली. त्यात न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? अशी विचारणा करत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाने या प्रकरणी 21 व 22 असे सलग दोन दिवस सुनावणी होण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आपला निकाल देऊ शकते किंवा तो राखून ठेवू शकते. या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.Shiv Sena
आज न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेना प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी सुरू होताच कोर्टाने ठाकरे व शिंदे गटाला तुम्हाला युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? याची विचारणा केली. त्यावर ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी आपल्याला 2 तास पुरेसे असल्याचे स्पष्ट केले. तर वकील डॉक्टर ए एम सिंघवी यांनी आपल्याला किमान 3 तास लागतील असे नमूद केले. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी काही मुद्दे एकमेकांशी जुळणारे असू शकतात असे नमूद करत सुनावणी 21 जानेवारीपर्यंत तहकूब केली.Shiv Sena
21, 22 जानेवारी रोजी सलग 2 दिवस सुनावणी
सुप्रीम कोर्ट यासंबंधी म्हणाले, या प्रकरणी काही मुद्दे एकमेकांशी जुळणारे असू शकतात. पण प्रथम, शिवसेनेच्या प्रकरणात युक्तिवाद सुरू होतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसेस येतील. याचिकाकर्त्या पक्षाला युक्तिवादासाठी 3 तासांचा वेळ दिला जाईल. तर प्रतिवादींना 2 तासांचा वेळ दिला जाईल. दोन्ही पक्षांना युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी व सोयीचे संकलन करण्यासाठी 1 नोडल वकील नियुक्त करता येईल. या प्रकरणी 21 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वा. सुनावणी होईल. त्यानंतर हे प्रकरण दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी रोजीही ऐकले जाईल. याचा अर्थ या प्रकरणी 21 व 22 जानेवारी रोजी सलग 2 दिवस या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
कोर्टाने दोन्ही पक्षांना 5 तास दिले – असीम सरोदे
ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी सुनावणी 21 जानेवारी रोजी संपून निकाल येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कोर्टाने आज दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी 5 तासांचा अवधी दिला आहे. त्यात एखादा तास मागेपुढे होऊ शकतो. गरज भासली तर ही सुनावणी दुसऱ्या दिवशीही (22 जानेवारी) कंटिन्यू केली जाईल. हे मी नाही तर कोर्टाने सांगितले आहे. कारण, महाराष्ट्रातील काही लोक म्हणतात तुम्ही सांगता तसे होत नाही. पण मी माझे नव्हे तर कोर्टाने जे म्हटले ते सांगत आहे. आता कोर्टाने जे सांगितले तसे ते करत नसतील तर आपण काय करणार? असे ते म्हणाले.
शिवसेनेत 2022 मध्ये झाले होते बंड
विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उघड बंड केले होते. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम गुजरात व तेथून गुवाहाटीला प्रयान केले होते. शिंदे यांनी नंतर आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता. त्यासंबंधीचा कायदेशीर लढा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे झाला. त्यात आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या गटाला दिले.
सुप्रीम कोर्ट सर्वच याचिकांवर करणार एकत्र सुनावणी
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्यांच्या या याचिकेसह इतर काही याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात एकगठ्ठा सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या 12 नोव्हेंबरच्या कामकाज यादीनुसार हे प्रकरण सुनावणीसाठी 19 व्या क्रमांकावर आहे. या सुनावणीत अनेक घटनात्मक व राजकीय मुद्यांवर उहापोह होण्याचीही शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आजच्या सुनावणीत आपल्याच पक्षाचा विजय होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
लोकशाहीची बूज राखणारा निर्णय येईल – अनिल देसाई
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देईल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टातील आजच्या अंतिम सुनावणीत शिवसेना पक्ष व चिन्ह यावर निर्णय येण्याची अपेक्षा आहे. या प्रकरणी सर्वच युक्तिवाद झालेत. त्यामुळे यावर अधिक काही करण्याची गरज नाही. त्यामुळे कोर्ट आपला अंतिम निर्णय देईल असा विश्वास आहे. ज्यानुसार न्यायमूर्ती सूर्यकांत बोलले त्यावरून या प्रकरणी पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याची गरज नाही. आम्ही आशावादी आहोत. निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा, लोकशाहीची बूज ठेवणारा निकाल नक्कीच येईल. कारण, आज लोकशाहीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात हे म्हटले जात आहे.
कोर्ट आम्हाला न्याय देईल हा विश्वास – अनिल परब
आमदार अनिल परब यांनीही आजच्या सुनावणीविषयी आपण आशादायी असल्याचे म्हटले आहे. आम्ही नेहमीप्रमाणे आशावादी आहे. कोर्ट आम्हाला न्याय देईल हा विश्वास आहे. अपेक्षा करणे हेच आमचे काम आहे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन केला होता. अनिल परब यांनी त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. कुणी कुणालाही फोन करू शकतो. एखाद्याची प्रकृती बरी नसेल तर त्याला फोन करण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App