विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कारचा स्फोट झाला दिल्लीत, पण पाकिस्तानी सैन्याची आपत्कालीन बैठक झाली इस्लामाबादेत. कारण पाकिस्तानी सैन्याला भारताच्या operation sindoor 2.0 सुरू होण्याची भीती वाटली.
दिल्लीतल्या स्फोटाचा तपास अजून सुरू आहे. सरकारने अजून त्या संदर्भात पाकिस्तानचे किंवा कुठल्याही दहशतवादी संघटनेचे नावही जाहीर केलेले नाही. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर फक्त संशय आहे. तरी देखील पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी इस्लामाबाद मध्ये बैठक घेऊन पाकिस्तानी सैन्याची तयारी किती आहे याचा आढावा घेतला कारण त्यांना भारताच्या ऑपरेशन सिंदूर 2.0 ची भीती वाटली.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात काल 10 नोव्हेंबर रोजी आय-20 कारचा स्फोट झाला. त्यात आतापर्यंत 9 जण दगावले. या स्फोटात जैश-ए-मोहम्मदाचा हात असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पाकमध्ये आपत्कालीन बैठक झाली. यापूर्वी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम हल्ला झाला होता. त्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळीबार केला होता. भारताने त्यानंतर 9 मे रोजी भल्या पहाटे पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवला होता. त्यात मौलाना मसूद अझहर याच्या जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी ठार झाले होते.
दिल्लीत काल धमाका झाला. हा हल्ला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित सदस्यांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. यामुळे तिकडे इस्लामाबादमध्ये सुद्धा हालचालींना वेग आला आहे. या आत्मघातकी हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील लष्कर आणि राजकीय नेतृत्व पुढे भारताचे पाऊल काय असेल?, याची चाचपणी करत आहे. तीनही दलाच्या प्रमुखांची आपत्कालीन बैठक घेतली. राजस्थानच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी वायूसेनेने पेट्रोलिंग वाढवली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी मध्यरात्री गुप्तहेर संघटना ISI चे डीजी आणि NSA सोबत बैठक घेतली. त्याचा तपशील समोर आलेला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याचे वक्तव्य यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे.
– पाकिस्तानी सोशल मीडियात हल्ल्याची भीती
तर दुसरीकडे कालपासून पाकिस्तानच्या सोशल मीडियात दिल्लीतील स्फोटाची जोरदार चर्चा झाली. हा हल्ला भारतानेच घडवून आणला आणि त्यानिमित्ताने भारताला पाकिस्तानीशी युद्ध करायचे असल्याचा दावा तिथला मीडियाने केला. तर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी या हल्ल्यामागे जैश असल्याचा दावा करत पाकिस्तानी सोशल मीडियावरील लोकांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र अजून यंत्रणांनी याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण यामध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे कनेक्शन समोर येत आहे, तर भारत पुन्हा हल्ला करण्याची भीती पाकिस्तानातील सोशल मीडियावर वर्तवण्यात येत आहे.
– ब्रिटनचा पाकिस्तानला इशारा
ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला, तर पाक लष्करालाही एलओसीवर कोणतीही कुरापत न करण्याचा सल्ला दिला. अमेरिकन दुतावासानेही त्यांच्या नागरिकांना जम्मू आणि काश्मीर यात्रेदरम्यान काळजी घेण्याचा सल्ला दिला. फ्रान्सचा दुतावासानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगातील अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला, तर पाकिस्तानने बैठकांचे सत्र सुरू केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App