शरद पवारांनी डाव टाकला, त्यांनी खेळी केली, धोबीपछाड दिला, कात्रजचा घाट दाखविला, अशा स्वरूपाने शरद पवारांच्या सगळ्या बातम्या त्यांच्या समर्थकांनी कितीही रंगविल्या, तरी त्यांचा राजकारणातला प्रभाव घटला. जिथे जिथे म्हणून त्यांचा एकहाती प्रभाव होता, तिथे तिथे त्यांच्या सत्तेत वाटा निर्माण झाला किंबहुना त्यांच्या प्रभावाला ओहोटी लावण्यासाठी रेटा लावला गेला, याची अनेक उदाहरणे समोर आली. Pawar uncle nephew
यातूनच खेळाच्या राजकारणात पवार काका – पुतणे भाजपच्या दारात!!, हे राजकीय वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले.
– कुस्तीगीर परिषदेतले राजकारण
कुस्तीच्या राजकारणात शरद पवारांचा प्रभाव ओसरला. तिथे भाजपचा प्रभाव निर्माण झाला. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद भारतीय कुस्ती महासंघाने 2022 मध्ये बरखास्त केली. शरद पवारांच्या जागी भाजपचे खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पदी निवड झाली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांचा एकहाती प्रभाव होता, तिथे भाजपने पाचर मारून ठेवली. रोहित पवारांनी मध्यंतरी हालचाली करून वेगळीच कुस्तीगीर परिषद काढायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला. त्यांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे अधिमान्यताच मिळू शकली नाही.
– ऑलिंपिक असोसिएशन मधले राजकारण
त्या पाठोपाठ महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन मध्ये अजितदादांची एकहाती असणारी दादागिरी संपुष्टात आली. स्वतःचे अध्यक्षपद कोण ठेवण्यासाठी अजित पवारांना भाजपची तडजोड करावी लागली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी लावावी लागली. दोन वर्षानंतर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष पद देऊ असे आश्वासन अजित पवारांना भाजपला द्यावे लागले. म्हणून भाजपने अजित पवारांची नियुक्ती महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष पदावर बिनविरोध होऊ दिली अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची निवडणूक घेऊन तिथे अजित पवारांचा पराभव केला असता. पण अजित पवार यांनी भाजपची तडजोड केली आणि स्वतःचे अध्यक्षपद दोन वर्षांसाठी टिकवून धरले.
– मुंबई क्रिकेट असोसिएशनचे राजकारण
त्या पाठोपाठ आज शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाजपशी सहकार्य करण्याच्या हेतूने पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये शरद पवार आणि भाजपचे मंत्री आशिष शेलार यांचे साटेलोटे असून या दोघांचाही त्यावर प्रभाव आहे परंतु त्यात सगळ्यात मोठा अँगल आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा निर्माण झाला आहे कारण उद्धव ठाकरेंचे पीए विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेत. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली रिंग त्या निवडणुकीत टाकली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि काही तडजोड व्हावी यासाठी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई क्रिकेट असोसिएशन वर शरद पवारांचे एक हाती वर्चस्व होते, ते आता तेवढे एकहाती राहिले नसल्याचेच ते निदर्शक ठरले. पवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागली. अशा रीतीने खेळाच्या राजकारणात आपले उरलेसुरले अस्तित्व टिकवण्यासाठी पवार काका – पुतण्यांना भाजपच्या दारात जावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App