विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : Narayan Rane भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोघं भाऊ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र बोलत आहेत. पण सत्तेवर येण्याची ताकद त्यांच्यात नाही, असा टोला राणेंनी लगावला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी काहीच केलं नाही, त्यांचं अस्तित्व संपत चाललंय आणि आता त्यांच्या हाती फक्त भाषणे उरली आहेत, अशी टीका करत राणेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.Narayan Rane
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याच्या मार्गावर दिसत आहेत. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन्ही गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट, एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहर विकास आघाडी या नावाने दोन्ही गट मिळून ही निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा रंगत आहे. नुकतीच कणकवलीत झालेल्या गुप्त बैठकीमुळे या चर्चांना अधिक जोर आला आहे. या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत उपस्थित होते. नगरपंचायतीसाठी संभाव्य आघाडी आणि उमेदवार निवड यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.Narayan Rane
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की, जर शिंदे गटाने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली, तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाशी सर्व संबंध तोडू. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विशाल परब आणि राजन तेली मला मनापासून मान्य नाहीत. मी त्यांचा नेहमी विरोध करीन. राणेंनी यावेळी एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले आणि ज्यांना सगळ्यांनी टाकून दिलं, त्यांना शिंदे का गोळा करतोय? असा थेट प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांनी पुढे इशारा देत म्हटलं की, विशाल परब मला भेटला तर ब्रेकिंग न्यूज मिळेल, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष धमकीच दिली.
राणे यांनी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सांगितले की, मी स्वतः युती व्हावी, हेच इच्छितो. मात्र, ती युती कोणासोबत व्हावी, याचाही विचार करावा लागतो. ते म्हणाले की, जिल्ह्यात जागावाटपावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानुसार महायुती उमेदवार निश्चित केले जातील. या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या सुरू असलेली मतभिन्नता अधिक स्पष्ट झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. राणे यांनी पूर्वीपासूनच आपल्या जिल्ह्यातील राजकीय नियंत्रण कायम ठेवले आहे आणि शिंदे गटाचे स्थानिक नेते त्यांच्या विरोधात उभे राहत असल्याने त्यांचा संताप ओसंडून वाहत असल्याचं दिसतंय.
संजय राऊत यांच्या आजारपणाचा उल्लेख
याच पत्रकार परिषदेत राणे यांनी ठाकरे बंधूंवरही जोरदार टीका केली. त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील भेटींचा उल्लेख करत, दोघं बंधू सत्तेसाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सत्तेवर येण्याची क्षमता त्यांच्यात नाही, असे म्हणत हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं? त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं अस्तित्व संपत चाललंय. आता फक्त अस्त्रं आणि भाषणं शिल्लक राहिली आहेत, असे म्हणत राणेंनी टोला लगावला. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या आजारपणाचा उल्लेख करत, त्यांचं अस्त्र पण संपतंय, असे म्हणत राणेंनी अप्रत्यक्षपणे त्यांनाही टार्गेट केले.
शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास तो भाजपसाठी आव्हान
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप आणि राणे गट यांच्यातील आगामी राजकीय घडामोडींना आता अधिकच वेग येणार आहे. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही स्थानिक असली तरी तिचे राज्यस्तरीय परिणाम होण्याची शक्यता आहे. शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास तो भाजपसाठी आव्हान ठरू शकतो, तर राणेंनी अशा निर्णयाला उघड विरोध दर्शवून नवीन संघर्षाची बीजं पेरली आहेत. आता शिंदे गट काय भूमिका घेतो, राणे आपला दबाव किती वाढवतात आणि ठाकरे गट या समीकरणात किती पुढे जातो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीचं रण आता अधिक तापणार, एवढं मात्र नक्की.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App