विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली आहे.Manoj Jarange
नेमके प्रकरण काय?
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे सध्या जरांगे पाटील अडचणीत आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे समन्स जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान झालेल्या कथित उल्लंघनांशी संबंधित आहेत. मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या नियम आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.Manoj Jarange
10 नोव्हेंबरला चौकशीला बोलावले
या आंदोलनासाठी कोणतेही अधिकृत परवानगी न घेतल्याचा आरोप करत पोलिसांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी समन्समध्ये मनोज जरांगे-पाटील आणि इतर पाच जणांना 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
मनोज जरांगेंचे 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान उपोषण
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 27 ऑगस्टपासून आझाद मैदानात साखळी उपोषण केले होते. या उपोषणाची मागणी आरक्षणासोबतच, आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत ही होती. 2 सप्टेंबर रोजी सरकारच्या शिष्टमंडळाकडून गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता याच प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना हजर राहण्यास सांगितले आहे.
पोलिसांच्या समन्सनंतर जरांगेंची भूमिका काय?
दरम्यान, पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे आणि जरांगे-पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे कायदेशीर आव्हान वाढले आहे. या समन्सवर मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी पुढील भूमिका काय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंचे आव्हान स्वीकारले
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कथित हत्येच्या सुपारी प्रकरणी राज्यात निर्माण झालेल्या गदारोळात आता मोठी घडामोड झाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपी, स्वतः मुंडे आणि जरांगे यांची नार्को टेस्ट (Narco Test) करण्याची मागणी करत जे आव्हान दिले होते, ते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारले आहे.
जरांगे पाटील यांनी आव्हान स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांच्या शिष्टमंडळाने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, मनोज जरांगे पाटील हे नार्को टेस्टसाठी पूर्णपणे तयार आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींची नार्को टेस्ट आजच (तात्काळ) करण्यात यावी, अशी मागणीही जोरकसपणे केली आहे.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीला जरांगे यांनी त्वरित प्रतिसाद दिल्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने जातो आणि पोलीस या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App