एकनाथ खडसे यांचाच “न्याय” अजित पवारांना लावणार का??; फडणवीस सरकार समोर नेमका पेच!!; अजितदादांचा राजीनामा कधी??

एकनाथ खडसे यांनी भोसरीतली MIDC ची जमीन बाजारभावापेक्षा कमी किमतीत घेतली त्यासाठी आपला मंत्रिपदाचा प्रभाव वापरला, असा आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने ED ने मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्या पाठोपाठ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला.

आता तोच “न्याय” उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लावणार का असा नेमका पेच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत समोर आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या कोरेगावच्या महार वतन जमीन खरेदी विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी लावली. कारण 1800 कोटी रुपये किमतीची जमीन अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या आमेडिया कंपनीला फक्त 300 कोटींमध्ये विकण्यात आली. त्या बदल्यात फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी पार्थ पवारांच्या कंपनीने भरली. कारण महसूल विभाग आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्यांना स्टॅम्प ड्युटी सवलत दिली. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन चौकशी लावली पुण्याच्या तहसीलदारांना आणि दुय्यम उपनिबंधकांना निलंबित केले.

पण जो “न्याय” एकनाथ खडसे यांना लावून त्यांचा राजीनामा घेतला गेला तोच “न्याय” उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लावणार का??, असा गंभीर पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार समोर निर्माण झाला. नेमका हाच सवाल हे जमीन खरेदी प्रकरण बाहेर काढणाऱ्या अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून फडणवीस सरकारला विचारला.

केवळ चौकशी लावून आणि एक दोन वाक्यांमध्ये उत्तर देऊन अजित पवारांच्या मुलाचा जमीन घोटाळा दाबता येणार नाही काही गंभीर सवालांची उत्तरे मुख्यमंत्र्यांना द्यावीच लागतील, असे अंबादास दानवे यांनी संबंधित सोशल मीडिया पोस्टवर लिहिले.

– अजितदादा हे सरकारांसाठी नेहमीच डोकेदुखी

वास्तविक अजित पवारांचे मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्री पद हे कुठल्याही सरकारसाठी नेहमीच डोकेदुखी ठरले. त्यांच्या समर्थकांनी त्यांची प्रतिमा परखड बोलणारे, रोखठोक बोलणारे पण काम करणारे अशी केली असली तरी त्यांचे जमीन व्यवहार किंवा अन्य व्यवहार नेहमीच संशयास्पद राहिले. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सुद्धा त्यांच्याविरुद्ध 420 कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा अजूनही दाखल आहे. त्याचबरोबर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते विरोधी पक्ष नेते असताना अजित पवारांचा सिंचन घोटाळा हा विषय संपूर्ण राज्यभर तापविला होता. त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना अजितदादांच्या मंत्रिपदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची राजकीय डोकेदुखीच झाली होती.



– घोटाळे राष्ट्रवादीचे, किंमत चुकवावी लागली काँग्रेसला

सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळा या दोन्हींमध्ये राष्ट्रवादीचेच मंत्री अडकले होते. मात्र, त्याची किंमत पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पद गमावून चुकवावी लागली होती. स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कुठलेच भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते जे काही आरोप होते ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर विशेषतः अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर होते. गुलाबराव देवकरांवरही असाच भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्यावेळी त्यांचा राजीनामा घेतला गेला होता. तेलगी प्रकरणात छगन भुजबळ यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. पण सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळा यांचे आरोप अजित पवारांना चिकटून सुद्धा त्यांनी राजीनामा दिला नव्हता. पण अजित पवारांच्या या खुर्चीला चिकटून राहण्याची किंमत त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस यांना सत्ता गमावून चुकवावी लागली होती.

– उदय सामंत संशयाच्या घेऱ्यात

आता पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणात सध्याचे उद्योग मंत्री शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या खात्याने त्यांना स्टॅम्प ड्युटी सवलत दिल्याचे सकृत दर्शनी आढळले. हे उदय सामंत मूळचे शिवसेनेचे नेते नाहीत. ते पवार संस्कारित राष्ट्रवादीचेच नेते होते. त्यांची अजित पवारांशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. पण सामंत यांनी या प्रकरणात लगेच प्रतिक्रिया व्यक्त करून हात झटकून टाकले.

– राजीनामे घेणार का??

त्यामुळे पार्थ पवारांना विकलेल्या महार वतनाच्या जमिनीच्या संदर्भात अजित पवारांनी वापरलेला उपमुख्यमंत्री पदाचा अधिकार त्याचबरोबर उदय सामंत यांनी वापरलेला उद्योग मंत्री पदाचा अधिकार यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी चौकशी आणि तपास करणार का??, त्याचबरोबर एकनाथ खडसे यांना न्याय लावून त्यांचा राजीनामा घेतला तसेच अजित पवार आणि उदय सामंत या दोघांचेही राजीनामे फडणवीस घेणार का??, असे दोन कळीचे सवाल या निमित्ताने समोर आले आहेत.

Will Devendra fadnavis ask Ajith Pawar to resign over Parth pawar’s corruption??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात