नाशिक : शिंदेंच्या सेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवृत्तीची लागण; मुख्यमंत्री पदासाठी नुसतीच सुरू बडबड!!, असला प्रकार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून समोर येऊन राहिलाय. Eknath Shinde
वास्तविक मुख्यमंत्री पदासाठी धाय मोकलून बोलणे ही काही शिंदे सेनेची किंवा अगदी मूळ शिवसेनेतली राजकीय प्रवृत्ती नाही. किंबहुना तशी सवय देखील नाही. कारण एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेच्या संस्कारात वाढलेत, तिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोले आणि शिवसैनिक हाले, अशी स्थिती होती. बाळासाहेबांच्या मनातला माणूस मुख्यमंत्री व्हायचा आणि बाळासाहेबांची मर्जी उतरली की खुर्ची खाली करायचा. तिथे मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बोलून वगैरे दाखवायची पद्धत नव्हती.
ही पद्धत आणि प्रवृत्ती शरद पवारांच्या संस्कारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये “विकसित” झाली. राजकीय कर्तृत्वापेक्षा महत्त्वाकांक्षा मोठी आणि तिचा बभ्रा त्या महत्त्वाकांक्षेच्या पेक्षा मोठा, हा प्रकार खुद्द शरद पवारांपासूनच सुरू झाला. म्हणून तर पवारांच्या (न मिळालेल्या) पंतप्रधान पदाची चर्चा गेली 34 वर्षे महाराष्ट्राच्या राजकीय हवेत रेंगाळत राहिली आणि नंतर तिचे रुपांतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांमध्ये झाले. शरद पवारांच्या नंतरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे दुसऱ्या फळीतले नेते कायमचे पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. यापैकी कुठले नेते किती राजकीय कर्तृत्ववान आहेत??, आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या पक्षाच्या राजकीय कर्तृत्वावर या नेत्यांना मुख्यमंत्री पद मिळू शकते का??, त्यांना ते पद खेचून आणता येईल का??, असले कुठलेही सवाल राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनाला शिवलेही नाहीत. त्यांनी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना कायम पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवून ठेवले.
नेमकी याच प्रवृत्तीची लागण शिंदे सेनेत झालेली दिसली. म्हणून तर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांनी पुढच्या आषाढी एकादशीला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगांची पूजा करायचे साकडे घातले. ते जाहीरपणे बोलून दाखविले. आता त्यांच्या पुढे जाऊन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या महिलांच्या मनातले मुख्यमंत्री ठरवून ठेवले. त्यांनी तसे वक्तव्यच केले. लता शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती शिंदे सेनेत शिरल्याचे दिसले.
– बडबड करून नाही मिळत पद
वास्तविक असे जाहीर बोलून किंबहुना बडबड करून पंतप्रधान पद किंवा मुख्यमंत्री पद मिळत नसते. ते तसे कुणी देत नसते. हे एकनाथ शिंदे यांच्या सारख्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव घेतलेल्या नेत्याला समजायला हवे आणि त्यांनी आपल्या अनुयायांना समजून सांगायला हवे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कुठलीही बडबड न करता किंबहुना कुणालाही भनक लागू न देता मुख्यमंत्री केले होते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
– पोस्टर वर बसण्याची…
भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदाच्या नुसत्या बडबडी किंवा पोस्टर वरच्या खुर्च्या चालत नाहीत. तसे करणाऱ्यांचे हे दोन्ही पक्ष व्यवस्थित operation करतात, हे एकनाथ शिंदे यांना माहिती असायला हवे. त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळताना त्याचा अनुभव घेतला आहे. राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचे ठीक आहे. त्यांचे राजकीय कर्तृत्व तोकडे आहे. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याला स्वकर्तृत्वावर मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही. ते पद खेचून घेण्याची त्यांची क्षमता नाही. पोस्टर वरच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणे हीच त्यांच्या राजकीय आयुष्याची इतिकर्तव्यता आहे.
– शिंदेंचे भवितव्य उज्ज्वल
पण एकनाथ शिंदे यांचे तसे नाही. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची अजून तरी त्यांच्यावर व्यवस्थित मर्जी आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर एकनाथ शिंदे यांचे राजकीय भवितव्य अजूनही उज्ज्वल आहे. पण मुख्यमंत्रीपदाची बडबड केल्याने ते भवितव्य झाकोळले जाऊ शकते, हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांना आवरले पाहिजे. त्यांच्या बडबडीला अटकाव केला पाहिजे. कारण नुसत्या बडबडीतून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता नाही. ते मिळायचे असेल, तर ते भाजपच्या नेत्यांची मर्जी संभाळूनच मिळू शकेल अन्यथा नुसत्या बडबडीने त्यांचे नुकसानच होईल!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App