विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai Satya March मतदार याद्यांमधील गंभीर घोळ, मतचोरी आणि दुबार नावांवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ऐतिहासिक सत्याचा मोर्चा निघणार आहे. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढत आहेत. सत्याचा मोर्चा, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनातून मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात आवाज उठवला जाणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू दीर्घकाळानंतर एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पोहोचणार आहे, जिथे नेत्यांची भाषणे होणार आहेत.Mumbai Satya March
मोर्चात महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार आहेत. राज ठाकरे दादरहून सीएसएमटीकडे लोकलने प्रवास करून मोर्चाच्या अग्रभागी चालणार असल्याने या आंदोलनाबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नुकत्याच पार पडलेल्या रंगशारदा सभागृहातील मेळाव्यात राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील दोषांचे सविस्तर सादरीकरण केले होते आणि या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले होतं. मनसेने काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत मतदारयाद्यांतील गोंधळ उघड केला होता, ज्यामुळे या विषयाला राज्यव्यापी महत्त्व प्राप्त झालं.Mumbai Satya March
या मोर्चातून विरोधकांनी चार ठोस मागण्या पुढे केल्या आहेत. पहिली म्हणजे राज्यातील सर्व मतदारयाद्या तातडीने अद्ययावत केल्या जाव्यात. दुसरी म्हणजे दुबार नावे आणि बोगस नोंदी तात्काळ रद्द करण्यात याव्यात. तिसरी मागणी अशी की, मतदारयाद्यांमधील सुधारणा पूर्ण होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवाव्यात. आणि चौथी म्हणजे येत्या सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीसाठीची मुदत वाढवावी. या मागण्या केवळ राजकीय नव्हे, तर लोकशाहीच्या मूलभूत तत्वांच्या रक्षणासाठी आहेत, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
मोर्चाच्या मार्गावर मोठी गर्दी अपेक्षित आहे. फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा मोर्चा मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेल. महापालिकेसमोर मोठं व्यासपीठ उभारण्यात आलं असून, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांसह अनेक नेते भाषण करणार आहेत. राज्य निवडणूक आयोगावर बोगस मतदारांना संरक्षण दिल्याचा आरोप करत विरोधक आयोगाच्या कारभाराचा निषेध नोंदवणार आहेत.
काँग्रेसमध्ये मनसेसोबतच्या संयुक्त आंदोलनाबाबत मतभेद
तथापि, या मोर्चात काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी अंतर राखल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी अध्यक्ष नाना पटोले हे मोर्चात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती मिळते. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीबाबतही संभ्रम आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मनसेसोबतच्या या संयुक्त आंदोलनाबाबत मतभेद स्पष्ट झाले आहेत. काही काँग्रेस नेत्यांच्या मते, मनसेसोबत रस्त्यावर उतरण्याने पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, थोरात, वडेट्टीवार आणि नसीम खान यांच्यासारखे नेते मात्र मोर्चात हजेरी लावून काँग्रेसचा सहभाग निश्चित करत आहेत.
न्यायालयीन मार्गाचाही पर्याय खुला
मोर्चानंतर महाविकास आघाडी आणि मनसे या दोन्ही पक्षांनी पुढील रणनीती अधिक आक्रमकपणे आखण्याचा मानस व्यक्त केला आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, मतदार याद्यांतील गोंधळ हा केवळ प्रशासनिक त्रुटी नसून लोकशाही प्रक्रियेवरच घाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने अनेक पुरावे मिळाल्यानंतरही समाधानकारक उत्तर दिलेले नाही, त्यामुळे न्यायालयीन मार्गाचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात उद्धव आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर दिसणार असल्याने या मोर्चाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App