विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Kesari Sikandar Sheikh सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली (पंजाब) येथे अटक केली आहे. हरियाणातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीत दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. ती शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी मोहालीच्या एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर २६ ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार ऊर्फ हॅप्पी यालाही अटक केली. त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुले जप्त केली. या कारवाईची पोलिसांनी एकत्रित माहिती दिली.Kesari Sikandar Sheikh
चारही आरोपींकडून पोलिसांनी १.९९ लाख रोख, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन एसयूव्ही गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड (पंजाब) पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अटकेतील आरोपी हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम ऊर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत. उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाब आणि परिसरात ते पुरवत होते. आरोपींपैकी तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तर सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती हंस यांनी दिली.
दानवीरवर खून व दरोड्याचे गुन्हे
मुख्य आरोपी दानवीर याच्यावर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात खून, दरोडा, एटीएम फोडणे, आर्म्स अॅक्ट अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तो पपला गुर्जर टोळीचा सदस्य असून यूपी आणि मध्य प्रदेशातून शस्त्रांची तस्करी करण्याचे काम करतो.
सिकंदर शेख कुस्तीतही वादग्रस्त
पुण्यात २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या माती गटातील अंतिम फेरीत पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे सिकंदर वादग्रस्त ठरला होता. यानंतर २०२४ मध्ये त्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात भरतीही करून घेतले होते. मात्र नंतर त्याने ही नोकरी सोडली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तो पंजाबमध्येच राहत होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App