विशेष प्रतिनिधी
नागपूर : Bachchu Kadu कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील महाएल्गार आंदोलनावर चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बुधवारी फोनवर चर्चा केल्यानंतर कडू सरकारसोबत चर्चेस तयार झाले. आंदोलन सुरू ठेवून चर्चेसाठी जाणार असल्याचे कडू यांनी जाहीर केले. गुरुवारी होणाऱ्या या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले हेही कडू यांच्यासोबत सहभागी होणार आहेत.Bachchu Kadu
मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर कडू यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल व गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. “तुम्ही सांगाल तेव्हा बैठक होईल. या बैठकीत तुम्ही सांगाल त्या मुद्द्यांवर चर्चा होईल,’ असे शिष्टमंडळाने कडू यांना सांगितले. त्यानुसार कडू यांनी तयारी दर्शवल्याने आज गुरुवारी (३० ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. कर्जमाफी करतो पण तारीख सांगणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे. पण, सरकारने तारीख आणि वेळ दिली नाही, बैठक सकारात्मक झाली नाही तर ३१ आॅक्टोबर रोजी परत आल्यानंतर ‘रेल रोको’ आंदोलन करू, असा इशारा कडू यांनी दिला आहे. चर्चेला सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आम्ही तिकडे चर्चेला यायचे आणि नंतर सरकारने आंदोलन मोडीत काढायचे अशी भीती आंदोलकांना आहे. आंदोलकांना कुणी त्रास देणार नाही याची हमी द्या, अशी मागणी कडू यांनी केली. त्यावर गृह राज्यमंत्र्यांनी आंदोलकांना कुठलाही त्रास होणार नाही, अशी ग्वाही दिली.Bachchu Kadu
नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर आंदोलकांकडून महामार्ग मोकळा
आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत नागपूर खंडपीठाने बुधवारी सायंकाळपर्यंत महामार्ग आणि इतर रस्ते मोकळे करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आंदोलकांनी महामार्ग मोकळा करून दिला. मुंबईहून शिष्टमंडळ चर्चा करून परत येईपर्यंत आंदोलक काॅटन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लागून असलेल्या आंदोलनस्थळी थांबणार आहेत. प्रशासन तिथे पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तत्पूर्वी कडू स्वतःहून अटकेसाठी पोलिस ठाण्याकडे पायी निघाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App