विशेष प्रतिनिधी
नासिक, (रामतीर्थ परिसर) : दीपावलीच्या मंगल संध्याकाळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित भव्य ‘गोदावरी महाआरती’ सध्या अत्यंत भक्तिभावाने पार पडत आहे. संपूर्ण रामतीर्थ परिसर दिव्य प्रकाशात न्हाऊन निघाला. सहस्रावधी दीपांच्या झळाळीने आणि मंत्रोच्चारांच्या निनादाने गोदामाईचा तीर भक्तीच्या महासागरात रूपांतरित झाला. Deepotsavi Godavari Mahaarti
संध्याकाळी सूर्यास्तानंतर आरतीस प्रारंभ होताच ‘जय देवी सुरसरिते गोदावरी माता’ या गजराने परिसर दुमदुमतो आहे. शंखनाद, घंटारव आणि वेदमंत्रोच्चार यांच्या कंपनांनी नदीकाठचा प्रत्येक अणु जणू जीवंत झाला आहे. गोदामातेच्या पात्रासमोर उभे राहून हजारो भाविक दीपज्योती अर्पण करत आहेत. आरतीच्या प्रकाशात सर्वांचे मुखकमल तेजाने उजळत आहेत आणि वातावरणात अनिर्वचनीय शांती व आनंद पसरला.
गोदामाईचे पात्र श्रद्धेने अक्षरशः ओसंडून वाहिले. नाशिक शहरासह परिसरातील आणि बाहेरगावाहून आलेले भाविक घाटावर तुडुंब जमले. महिलांचा, युवकांचा आणि लहानग्यांचा उत्साह अपार आहे. अनेक भाविक कुटुंबासह आरतीत सहभागी होत आहेत. “प्रकाशातून भक्ती आणि भक्तीतून प्रकाश” . हा भावार्थ जणू प्रत्यक्ष साकार झाला.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, आणि स्वयंसेवकवृंदाने तत्पर व्यवस्थापन केले. घाटावरील वाहतूक, दीपवितरण, स्वच्छता व सुरक्षा या सर्व बाबींमध्ये स्वयंसेवकांन नियोजनबद्ध सेवा दिली. सर्वत्र शिस्त, भक्तिभाव आणि स्वच्छतेचा आदर्श संगम दिसून आला.
View this post on Instagram A post shared by Kp_snapbbox | Travel Photographer 🇮🇳 (@kp_snapbbox)
A post shared by Kp_snapbbox | Travel Photographer 🇮🇳 (@kp_snapbbox)
आरतीच्या वेळी स्तोत्रपठण, भजन, शंखनाद आणि गोदा स्तुती यांच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण पवित्रतेने भारले. अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. त्यांचा जणू गोदामाईशी थेट आत्मसंवाद झाला.
समितीच्या वतीने या प्रसंगी पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता व तीर्थपावित्र्याच्या जपणुकीचे आवाहन केले जात आहे. दीपदानानंतर भाविकांना नदीकाठ स्वच्छ ठेवण्याचे आणि गोदामाईप्रती सेवाभाव जपण्याचे आवाहन स्वयंसेवकांनी केले.
दीपावलीच्या या पवित्र रजनीत रामतीर्थ परिसर साक्षात दिव्यतेचा अवतार झाला. नाशिककरांच्या अखंड श्रद्धेने आज गोदामाईचा तीर ओसंडून वाहत आहे. ही महाआरती फक्त एक धार्मिक विधी नाही, तर नदी, निसर्ग, संस्कृती आणि भक्तीचा संगम ठरला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App