विशेष प्रतिनिधी
मुंबई : Congress आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.Congress
भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची असते, नेत्यांची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की, त्यांनी देखील कधीतरी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, त्यांना निर्णय घेऊ द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक आहोत, त्यामुळे आम्ही स्वबळावर लढूया, हीच आमची भूमिका आहे.Congress
त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही त्यांनी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच भूमिका स्पष्ट मांडली आहे. राज ठाकरे तर दूरच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही, असे वक्तव्य त्यांनी करून काँग्रेसच्या रणनीतीवर नवीन चित्र निर्माण केले आहे.
दरम्यान, भाई जगताप यांनी उद्धव ठाकरेंसोबतची परिस्थिती स्पष्ट करताना म्हटले की, महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नव्हती. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा त्यांची शिवसेना होती, पण आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी घ्यावा. त्यांनी आणखी स्पष्ट केले की, काँग्रेसने आजवर कधीही राज ठाकरेंसोबत जाण्याचा विचार केलेला नाही. उद्धव ठाकरेंसोबत देखील स्थानिक कार्यकर्त्यांची तयारी नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजे. भाई जगताप यांच्या या विधानाने काँग्रेसच्या भविष्यातील धोरणाबाबत नवी दिशा सुचवली आहे.
मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद – सचिन सावंत
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनीदेखील पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत आणि त्याबाबत कोणतीही शंका नाही. आमची बैठक चेन्निथला यांच्यासोबत झाली, त्यावेळी आम्ही आमची मते स्पष्टपणे मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेतले जातात. काँग्रेस हायकमांड सर्व नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल, असे सावंत यांनी सांगितले. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, काँग्रेस सध्या कोणत्याही युतीच्या दबावाखाली न येता, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार पुढे जाण्याच्या तयारीत आहे.
महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता
राज्याच्या राजकीय पटलावर मुंबई महानगरपालिका निवडणूक हा प्रतिष्ठेचा मुद्दा मानला जातो. मुंबईवर सत्ता प्रस्थापित करणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात बळ मिळवणे, असा समज आहे. अशा वेळी भाई जगताप यांचे वक्तव्य काँग्रेसच्या स्वतंत्र लढाईच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. काँग्रेसने जर स्वबळावर निवडणूक लढवायचा निर्णय कायम ठेवला, तर महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिंदे गट यांच्या जोरदार तयारीमुळे स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App