विशेष प्रतिनिधी
वाशी : Vashi Raheja नवी मुंबईच्या वाशी परिसरातील सेक्टर 14 मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांची चिमुरडी आणि एका 84 वर्षीय आजीचा समावेश आहे.Vashi Raheja
प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री 12.40 च्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच आगीने 11 व 12 व्या मजल्यावरही भीषण स्वरूप धारण केलं. या दरम्यान इमारतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.Vashi Raheja
आगीचं स्वरूप आणि बचावकार्य
आगीची माहिती मिळताच वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. धुरामुळे संपूर्ण इमारत गुदमरून गेल्याने रहिवाशांना श्वास घेणे अवघड झाले होते. काहींना बचावासाठी क्रेन आणि जिन्यांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. वाशी अग्निशमन विभागाचे अधिकारी म्हणाले की, प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं दिसत आहे. मात्र, नेमकं कारण समजण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.
मृत आणि जखमींची माहिती
या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये –
वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6) कमला हिरल जैन (वय 84) सुंदर बालकृष्णन (वय 44) पुजा राजन (वय 39) तर 10 जण जखमी असून, त्यांना हिरानंदानी रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
इमारतीतील रहिवाशांची धावपळ
रात्री अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. इमारतीत धूर पसरल्याने रहिवाशांना बाहेर पडणं कठीण झाले. अनेकांनी बाल्कनीतून मदतीसाठी हाका मारल्या. काहींना अग्निशमन दलाने सुरक्षा जाळ्यांचा वापर करून वाचवले. सुदैवाने वेळीच अग्निशमन पथक दाखल झाल्याने आणखी मोठी जीवितहानी टळली.
प्रशासनाकडून तपास सुरू
नवी मुंबई पोलिसांनी या घटनेचा पंचनामा सुरू केला असून, अग्निशमन दलाकडून प्राथमिक अहवाल मागवण्यात आला आहे. नगरसेवक आणि महापालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, इमारतीतील विद्युत वायरिंग जुनी होती, त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेमुळे वाशी परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि रहिवाशांनी शासनाकडे इमारतींच्या सुरक्षा तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App