पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणवारांच्या काळात vocal for local ही घोषणा देऊन आता बरीच वर्षे झाली. त्याचा चांगला परिणामही दिसून आला सहवाराच्या काळात देशांतर्गत खरेदी वाढली, पण ती मोठमोठ्या मॉल आणि स्टोअर्स मध्ये एकवटली गेली. स्वदेशी वस्तूंना प्राधान्य आले, ऑनलाइन खरेदीतून परदेशी ब्रँडचे सुद्धा आकर्षण वाढले. पण त्यामुळे भारतीय सणवारांच्या काळातली उलाढाल परदेशी कंपन्यांच्या पथ्यावर पडली. त्यांची अर्थव्यवस्था सुधारली. आपल्या सणवारांचा देशातल्या अर्थव्यवस्थेला हवा तसा फायदा मिळत नाही.
या पार्श्वभूमीवर स्वदेशी दिवाळीत स्थानिक खरेदीला महत्त्व देऊन गरीब आणि मध्यमवर्ग यांच्या घरातही प्रकाश पर्व साजरे करण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. ऑनलाइन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक बाजारातून खरेदी केली तर आपला पैसा छोटे उद्योजक, छोटे व्यवसायिक, स्थानिक कारागीर, महिला बचत गटातील महिला यांच्याकडे जाऊन त्यांच्या घरातील चांगले प्रकाश पर्व साजरे होऊ शकतो असा विचार आता बळावत चालला आहे. अनेकांनी त्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी ही मोहीम त्यातलाच एक भाग आहे. – दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व, आनंदपर्व आणि समृद्धीचे पर्व. हा उत्सव आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक मूल्यांची ओळख आहे. प्रभू श्रीराम वनवासातून परतले, नरकासुराचा वध झाला, लक्ष्मीची पूजा झाली—प्रत्येक कथेचा सार एकच, तो म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय. परंतु, बदलत्या काळात या उत्सवाचे स्वरूपही बदलले आहे. जागतिकीकरणाच्या ओघात परदेशी वस्तूंनी आपल्या बाजारात शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत, आपल्या संस्कृतीचे मूळ जतन करण्यासाठी आणि आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ हा संकल्प आणि कृतीची गरज आहे.
– स्वदेशी म्हणजे केवळ विदेशातील वस्तूंचा त्याग एवढाच मर्यादित नाही, तर तो आहे ‘आपल्या देशातील उत्पादनांना आणि कारागिरांना प्राधान्य देणे’. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि vocal for local या संकल्पना याच विचारांवर आधारित आहेत. दिवाळीला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. जर ही उलाढाल स्थानिक उत्पादनांसाठी झाली, तर त्याचा थेट फायदा आपल्या देशातील लहान उद्योजकांना, कारागिरांना आणि गरीब कुटुंबांना मिळतो.
– रस्त्यांच्या कडेला मातीचे दिवे, आकाशकंदील, रांगोळीचे रंग, आणि घरगुती फराळाचे पदार्थ विकायला ठेवलेले दिसतात. अनेक कुटुंबांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन या काही दिवसांच्या व्यवसायावर अवलंबून असते. जेव्हा आपण चिनी माळ किंवा प्लास्टिकचे कंदील खरेदी करतो, तेव्हा आपला पैसा देशाबाहेर जातो आणि स्थानिक उत्पादकांचा आधार हिरावून घेतला जातो. याउलट, आपण जेव्हा कुंभाराकडून मातीचे दिवे घेतो, हाताने विणलेले कंदील विकत घेतो, किंवा स्थानिक महिला बचत गटांकडून फराळ खरेदी करतो, तेव्हा आपण एका साखळीला प्रेरणा आणि आधार देतो. हा पैसा त्याच स्थानिक अर्थचक्रात फिरतो आणि अनेक कुटुंबांच्या आयुष्यात लक्ष्मी बनतो.
– दिवाळीच्या अनेक पारंपरिक वस्तूंची जागा आज परदेशी वस्तूंनी घेतली आहे. प्लॅस्टिकच्या चायनीज दिव्यांच्या माळेऐवजी मातीच्या पणत्या वापरा. पणती पिढ्यानपिढ्या कुंभार समाजाला रोजगार देते. प्रदूषण करत नाही. पणत्यांच्या प्रकाशात सात्त्विकता आणि पारंपरिकता आहे.
– महागड्या विदेशी ब्रँड्सऐवजी हाताने विणलेले वस्त्र (हँडलूम) किंवा खादीचे कपडे खरेदी करा. हे कपडे लाखो विणकर कुटुंबांची उपजीविका आहेत आणि हे वस्त्र आपल्या देशाची प्राचीन आणि समृद्ध हस्तकला आहे.
– बाजारातील रेडीमेड मिठाईपेक्षा घरी बनवलेला शुद्ध, पारंपरिक फराळ (चकली, लाडू, चिवडा) किंवा स्थानिक गृहउद्योगातून मिठाई घ्या. यामुळे आरोग्य जपत स्थानिक महिला उद्योजकांना मदत होईल.
– मातीचे दिवे, कागदी कंदील आणि नैसर्गिक रंगांच्या रांगोळ्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असतात. याउलट, परदेशी प्लॅस्टिक उत्पादने आणि रासायनिक फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते. स्वदेशीचा संकल्प म्हणजे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची प्रेरणाच.
– अभ्यंग स्नानासाठी नैसर्गिक उटणे आणि सुगंधी तेल वापरणे ही आपली परंपरा आहे. बाजारातील रासायनिक उत्पादनांपेक्षा स्थानिक आणि नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य दिल्यास त्वचा आणि पर्यावरणाचे आरोग्य राखले जाते.
– आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी जागरूक जीवनशैली आहे. आपल्या सणांची खरी शोभा ही त्यांच्या पारंपरिकतेत आणि साधेपणात दडलेली आहे. स्वदेशी वस्तूंची खरेदी करून आपण एकाच वेळी संस्कृतीचे जतन, स्थानिक अर्थव्यवस्थेचे पोषण आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.
– प्रकाशाचा उत्सव’ साजरा करताना, आपण आपल्या देशातील, आपल्या भागातील कारागिरांच्या आणि उद्योजकांच्या जीवनातही समृद्धीचा प्रकाश घेऊन येऊ या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App