विशेष प्रतिनिधी
पुणे : Maharashtra Board SSC महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या फेब्रु-मार्च 2026 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आणि अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करता यावे, या हेतूने मंडळाने यंदाही परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जातील.Maharashtra Board SSC
लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी
मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, बारावी बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होईल. यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षांचा समावेश असेल. दुसरीकडे, दहावी बोर्डाची लेखी परीक्षा शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, 18 मार्च 2026 या दरम्यान घेण्यात येईल.Maharashtra Board SSC
लेखी परीक्षांच्या आधी, बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 09 फेब्रुवारी 2026 या दरम्यान होतील. तर, दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 02 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीने हे वेळापत्रक जारी करण्यात आले असून, या परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागण्याचे आवाहन
एकदा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शिक्षकांनाही शालेय पातळीवर आपले नियोजन करता येते. अभ्यासक्रम कसा शिकवायचा? त्यासाठीची तयारी काय असायला हवी? विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्या कशा आणि कधी घ्यायच्या? याचे शाळांना नियोजन करणे सोपे होते. त्यामुळेदेखील या सर्व बाबींचा विचार करूनच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App