विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. संभाजीनगरमधील मोर्चाला MIM चा पाठिंबा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.Eknath Shinde
हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी कोणालाही सोबत घेतील. आज एमआयएम आहे, उद्या पाकिस्तानलाही सोबत घेतील. त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही, असे खळबळजनक विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ शिंदे म्हणाले की, मागच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले. काहींनी दहशतवाद्यांच्या कबरी सजवण्याचे काम केले होते. आता तेच लोक घटनात्मक पदांवर, सर्वोच्च न्यायालयावर आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. पण आज तेच आयोगाकडे जात आहेत. ही चांगली सुधारणा म्हणावी लागेल, असा टोला त्यांनी लगावला.Eknath Shinde
बाळासाहेब ठाकरे ब्रँड हाच आमचा ब्रँड
शिंदे यांनी पुढे सांगितले की, आमचा एकच ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे ब्रँड. त्याच विचारांवर आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर महायुती येणाऱ्या निवडणुकीत विजयी होणार, असा मला ठाम विश्वास असल्याचेही ते म्हणाले. मी फक्त बाळासाहेब ब्रँड ओळखतो, बाकी कोणताही नाही. मला फक्त बाळासाहेब ठाकरे ब्रँड माहिती आहे. असे सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे बँडच्या वक्तव्यावर निशाणा साधला. महापालिका निवडणुकीत महायुतीलाच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कधी घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कधी घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत. जेव्हा लोकांच्या सेवेसाठी बाहेर पडायची वेळ होती, तेव्हा हेच लोक म्हणायचे आमचे हात रिकामे आहेत. आता अचानक भावनिक मोर्चे काढून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला जातोय. राज्यातील शेतकरी संकटात आहेत. आम्ही त्यांच्या बांधाबांधावर गेलो, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि ठरवले की, या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. म्हणूनच आम्ही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून, अटीशर्ती न पाहता मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली, असे शिंदे म्हणाले.
32 हजार कोटींचे पॅकेज दिले
शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं आम्ही सांगितलं होते. आज त्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होत आहेत. आम्ही 32 हजार कोटींचे पॅकेज दिले, 47 हजार हेक्टरी मदत केली, तर जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मनरेगामार्फत प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिले. इतिहासात कधीच इतकी मदत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती, असा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांची दिवाळी चांगली, आता निव्वळ राजकारण
शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली. त्यांचा दसरा चांगला झाला, दिवाळी आणखी चांगली होईल. आम्ही प्रत्यक्ष मदत पोचवली, मोठमोठे किट दिले. पण हे लोक शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत आहेत. शेतकऱ्याच्या पोराच्या डोळ्यात अश्रू पाहून किमान बिस्कीटचा पुडा तरी दिला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हा कसला हंबरडा मोर्चा?
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावर टीका करताना म्हटले की, हे कसले हंबरडा मोर्चे काढतात? सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. आता शेतकऱ्यांच्या नावाखाली हंबरडा फोडत आहेत. हे पुतणा-मावशीचे प्रेम आहे. निव्वळ राजकीय नाटक आहे.
महापालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालतो. बाळासाहेब ब्रँड हाच आमचा ब्रँड आहे. केलेल्या कामाच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादाने आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App