नाशिक : महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रात पवारांच्या कुटुंबीयांनी जे राजकीय वर्चस्व निर्माण केले, ते काँग्रेस पक्ष मोडून काढू शकला नाही. पण सत्ताधारी भाजपने मात्र त्या वर्चस्वाला व्यवस्थित सुरुंग लावला. आधी शरद पवारांच्या हातातून कुस्ती महासंघ काढून घेतला. तिथे भाजपचे खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदावर वर्णी लावली. राज्य कुस्तीगीर परिषद सुद्धा ताब्यात घेतली. रोहित पवारांना तिथे कुस्तीगीर परिषदेच्या एका गटाचे अध्यक्ष व्हावे लागले. वेगळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवावी लागली, पण तिला अधिकृत मान्यता मिळू शकली नाही.
शरद पवार आतापर्यंत ऑलिंपिक संघटनेचे कबड्डी, कुस्ती, खो-खो संघटनेचे अध्यक्ष राहिले. तोच कित्ता अजित पवार यांनी गिरवला. त्यांच्या पाठोपाठ रोहित पवार सुद्धा क्रीडा क्षेत्रात आले.
पण पवार कुटुंबीयांच्या याच वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावून आता अजित पवारांनाही आव्हान दिले आहे. अजित पवार सलग तीन टर्म महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष राहिले. ते आता पुन्हा निवडणुकीत उतरले असून त्यांच्या वर्चस्वाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात आपली हॅट टाकली आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपने आपल्या सत्तेच्या वळचणीला घेतले असले तरी त्यांचे जुने वर्चस्व किंवा जुनी दादागिरी सहन केलेली नाही आणि करणार नाही हेच या तगड्या खेळीतून भाजपने दाखवून दिले.
– ऑलिंपिक संघटनेत निवडणूक
महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेत अजित पवार सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले. चौथ्या टर्म साठी त्यांनी अर्ज भरला, त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणी तगडा उमेदवार असणार नाही, अशा अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या होत्या, पण भाजपने मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीत उतरवून अजित पवारांसमोर केवळ तगडे आव्हानच उभे केले असे नाही, तर अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची तयारी चालविली. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत 60 प्रतिनिधी मतदान करणार आहेत. 30 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी यांचा त्यात समावेश आहे. या 30 क्रीडा प्रकारांच्या संघटनांमध्ये अजित पवारांचे भरपूर समर्थक भरले असले, तरी आता त्या संघटनांमध्ये सुद्धा अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व उरलेले नाही. किंबहुना भाजपने सत्तेचा वापर करून तिथेही कागडा वळवून ठेवला आहे. त्यामुळे जे काँग्रेसला जमले नाही ते भाजप घडवून आणतो आहे. क्रीडा क्षेत्रातल्या राजकारणात पवार कुटुंबीयांच्या वर्चस्वाला आतून पोखरून सुरुंग लावत आहे.
– अजितदादांची जुनी मनमानी चालणार नाही
अजितदादा ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर निवडून आले, तरी त्यांना जुनी मनमानी करता येणार नाही कारण सत्ताधारी भाजपचे सावट त्यांच्यावर कायम राहील अजितदादा जुन्या काँग्रेसच्या काळात मनमानी पद्धतीने दादागिरी करत होते तसली दादागिरी भाजप सहन करणार नाही. कारण भाजपला भविष्यात अन्य कुठल्याही पक्षांपेक्षा सर्व क्षेत्रांवर स्वतःचे वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने भाजप वेगवेगळ्या संस्था संघटना ताब्यात घेतो आहे. ऑलिंपिक संघटना हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून तर संघ स्वयंसेवक असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना ताकद देऊन भाजपने अजितदादांच्या समोर उभे केले आहे. मोहोळ निवडून आले नाहीत, तरी अजितदारांना भाजपच्या सावटाखालीच कारभार करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App