वृत्तसंस्था
मुंबई : भारताच्या विकास प्रवासात ब्रिटनचे स्वागत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. भारत आणि ब्रिटनमधील व्यापार करारानंतर दोन्ही देशांना फायदा होईल. गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्या भेटीदरम्यान मोदी म्हणाले की, जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत आणि ब्रिटनमधील मैत्री जगासाठी खूप महत्त्वाची आहे. स्टार्मर म्हणाले की, २०२८ मध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. ब्रिटन भारतासोबत सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. भारत आणि ब्रिटनने एक मोठा संरक्षण करारही केला. याअंतर्गत ब्रिटन भारतीय सैन्याला हलकी क्षेपणास्त्रे पुरवेल. या कराराची किंमत सुमारे ४२०० कोटी रुपये आहे.
पंतप्रधान मोदींनी स्टार्मरसमोर ब्रिटनमध्ये भारतविरोधी खलिस्तानी समर्थकांना रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला. लोकशाहीत हिंसाचार व कट्टरवादाला स्थान नसल्याचे ते म्हणाले.स्टार्मर १२५ हून अधिक उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते.
स्टार्मर म्हणाले, भारतीय हवाई दलाचे फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आता ब्रिटिश रॉयल एअर फोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील.मोदी म्हणाले की, फिनटेक (डिजिटल वित्तीय सेवा) क्षेत्रात भारताची क्षमता पाहिली आहे. ब्रिटन आणि भारत आता डिजिटल प्लॅटफॉर्म क्षेत्रात सहकार्य वाढवेल. महत्त्वाच्या खनिजांवर सहकार्यासाठी पुरवठा साखळी वेधशाळा स्थापन केली जाईल. सॅटेलाईट कॅम्पस झारखंडच्या धनबाद येथील इंडियन स्कूल ऑफ माइन्स येथे असेल. ब्रिटनशी संबंध मजबूत करण्यासाठी, व्हिजन २०३५ अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये सहकार्यावर काम केले जाईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, अणुऊर्जा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. २०३० पर्यंत ५०० गीगावॅट अक्षय ऊर्जा मिळविण्याचे लक्ष्य आहे.
व्यापार तर वाढेल, व्हिसामध्ये वाढ हवी
ब्रिटनसोबतच्या व्यापार करारानंतर, नवीन करारांमुळे आमचा व्यापार निश्चितच वाढेल. ब्रेक्झिटनंतर भारत हा ब्रिटनचा नैसर्गिक भागीदार आहे. ब्रिटनला भारताच्या मोठ्या बाजारपेठेची आवश्यकता आहे. परंतु वस्तूंसह सेवा क्षेत्रातही आमची भूमिका अधिक दृढतेने मांडली पाहिजे. भारतीय व्यावसायिकांना ब्रिटनमध्ये अधिक व्हिसा मिळायला हवा. सध्या भारतातून दरवर्षी ८२ हजार व्यावसायिकांना कामासाठीचा व्हिसा मिळतो. भारताला हा कोटा १.२५ लाखांपर्यंत वाढवायचा आहे. ही वाढ भारतीय व्यावसायिकांच्या हितासाठी महत्वाची ठरू शकते.
ब्रिटनच्या ३ विद्यापीठांचे मुंबईत कॅम्पस
ब्रिटन आणि भारत यांच्यातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक भागीदारीमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची एक मोठी संधी प्राप्त झाली आहे. उभय देशांनी केलेल्या करारानुसार ब्रिटनमधील एकूण ९ प्रमुख विद्यापीठांचे कॅम्पस आता भारतात सुरू होणार असून, यापैकी ३ कॅम्पस एकट्या मुंबई शहरात उघडण्याचा प्रस्ताव आहे.
मुंबईत कॅम्पस उघडण्यासाठी तयारी दर्शवलेली तीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठे पुढीलप्रमाणे आहेत : ब्रिस्टल विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ आणि ॲबरडीन विद्यापीठ. उर्वरित विद्यापीठांचे कॅम्पस देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये उघडणार आहेत. यात साउदम्प्टनचा विद्यापीठ कॅम्पस (गुरुग्राम ) लिव्हरपूल विद्यापीठ कॅम्पस (बंगळुरू ) , लँकेस्टर, सरे, कोव्हेंट्री आणि क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट यासारख्या विद्यापीठांचे कॅम्पस गिफ्ट सिटी (गुजरात) आणि बेंगळुरू येथे सुरू करण्यासाठी प्रस्तावित आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App