विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
कुंभमेळा श्रद्धा, संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असल्याने सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करावीत तसेच नाशिक येथील नवीन रिंगरोडसह साधूग्राम व टेंटसिटीसाठीची भूसंपादनाची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना दिले.
रामकुंड आणि गोदावरी नदीपात्राचे पाणी स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर दिला जावा. तसेच मलनि:स्सारण, विमानतळ, रेल्वे, आणि रस्त्यांच्या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, यासाठीच्या निधी मंजुरीसाठी त्वरित अंमलबजावणी करावी. साधूग्राममध्ये आखाड्यांच्या गरजेनुसार सुविधा, पोलिस निवासाची व्यवस्था, सीसीटीव्ही प्रणाली, एआय आधारित कायदा सुव्यवस्था, तसेच सार्वजनिक वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.
– डिजिटल कुंभ संकल्पना
कुंभमेळ्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी ‘डिजिटल कुंभ’ ही संकल्पना राबविण्यात यावी. प्रचार प्रसिध्दीसाठी स्वतंत्रपणे वेगळा आराखडा तयार करून, नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा कामांसंदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी होत असल्यास, संबंधित विभागांनी यासंदर्भातील वस्तूनिष्ठ खुलासा त्वरित संबंधित माध्यमांना द्यावा. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App