नाशिक : पवार संस्कारित नेते एकमेकांची झाकतात आणि बाळासाहेब संस्कारित नेते एकमेकांचीच काढतात!!, पण राजकीय आरोप – प्रत्यारोपांमध्ये गुन्हे दडपून जातात असे चित्र महाराष्ट्रात दिसून राहिलेय.
आपापल्या गावांमध्ये आणि आपापल्या तालुक्यांमध्ये आपापले कारनामे झाकून राहावेत म्हणून पवार संस्कारित नेते कुणाच्याही सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले. त्यासाठी त्यांनी कुठलाही विधी निषेध बाळगला नाही. काँग्रेस “अस्पृश्य”, भाजप “अस्पृश्य” असला प्रकार केला नाही. आपले कारनामे वाचवायचे असतील, तर सत्तेशिवाय पर्याय नाही, हे सत्य जाणून पवार संस्कारित नेत्यांनी तोंडी फुले शाहू आंबेडकरांची भाषा वापरली तरी प्रत्यक्ष कृतीत मात्र सत्तेशिवाय दुसरी कुठलीही भाषा केली नाही. त्यासाठी त्यांनी घरे फोडली, काही घरे जोडली, पवारांनी तर त्यासाठी स्वतःचे घर सुद्धा फुटू दिले, पण सत्ता नाही सोडली. हे सगळे चित्र गेल्या 20 – 25 वर्षांत महाराष्ट्राने जवळून पाहिले.
त्यामुळे बाळासाहेब संस्कारित नेत्यांनी एकमेकांची काढण्यातच धन्यता मानली. सगळे नेते बाळासाहेबांचा अंमलाखाली शिवसेनेत एकत्र नांदत होते तोपर्यंत सगळे बरे चालले होते. तोपर्यंत कुणाचीही उणीदुणी कुणालाही दिसली नव्हती. पण टप्प्याटप्प्याने शिवसेना फुटत गेल्यानंतर मात्र सगळ्यांना एकमेकांच्या उणीवा ठळक दिसल्या आणि त्या वाभाडे काढण्यापर्यंत पोहोचल्या.
उद्धव ठाकरे विरुद्ध रामदास कदम
सध्या हीच चित्र महाराष्ट्रात शिवसेनेत दिसतेय. बाळासाहेबांच्या देहाशी कुणी खेळ केला??, त्यांच्या बोटाचे ठसे कुणी घेतले??, असे सवाल करून रामदास कदम यांनी मोठी राजकीय राळ उडवून दिली. रामदास कदम यांना अनिल परबांनी उत्तर देऊन 1993 मध्ये जाळली की जाळून घेतली??, असा सवाल केला. हे दोन्ही नेते कायम शिवसेनेत होते तोपर्यंत बोटांचे ठसे कुणी घेतले??,कुणी कुणाला जाळले? हे सवाल त्यांना पडले नव्हते. पण शिवसेना फुटल्या बरोबर हे सवाल ऐरणीवर आणले गेले. बाळासाहेब गेल्यानंतरही मंत्रीपद स्वीकारायला रामदास कदम यांना लाज वाटली नाही का??, असा सवाल अनिल परब यांनी केला.
आरोप – प्रत्यारोपांमध्ये गुन्हे झाकले
हे फक्त आजच घडले असे नाही, तर शिवसेनेच्या फुटण्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे असेच घडत गेले होते. पण यातून कुठलीही कायदेशीर कारवाई होऊन कोणाला शिक्षा झाल्याचे उदाहरण समोर आलेले नाही. हीच यातली खरी मेख आहे. अन्यथा बाळासाहेबांच्या देहाशी खेळ करणे, किंवा त्यांच्या बोटांचे ठसे घेणे त्याचबरोबर कुणी कुणाला जाळणे हे कायद्याच्या कक्षेत येणारे गंभीर गुन्हे आहेत. त्यांची चौकशी आणि तपास मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये आत्तापर्यंत तरी झाकून गेलेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App