विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी होणार असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूर स्थिती लक्षात घेता त्या भागातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.Eknath Shinde
राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून त्यांचे अश्रू पुसणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः शिंदे यांनी अतिवृष्टी ग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील दोन-तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन नुकसानीचे प्रमाण स्पष्ट होईल आणि त्यानंतर मदतीबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.Eknath Shinde
शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली जाईल
मदतीसाठीचे नियम-अटी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे, असे मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने ठरल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आधीच्या सरकारनेही मदत वाटपाच्या वेळी नियम शिथिल केल्याची आठवण त्यांनी करून दिली. पुरामुळे जमीन वाहून गेली आहे, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे, जीवितहानी झाली आहे तसेच काही ठिकाणी घरे अद्याप पाण्याखाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अशा वेळी शिवसेना पूरग्रस्त शेतकऱ्यांना 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देत असून, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली जाईल, असे ते म्हणाले.
विरोधकांनी फोटोसेशन करून राजकारण करू नये
याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी फोटोसेशन करून राजकारण करू नये, असे आवाहन केले. पूर स्थितीतील साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर, चिपळूण येथे ज्याप्रमाणे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले होते त्याच प्रमाणे यंदा स्वच्छता मोहीम आणि आरोग्य शिबिरे घेऊन पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
“आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना” हेच आमचे धोरण आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही
दसरा मेळाव्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे व एमएमआरडीए परिसरातील शिवसैनिकांना आमंत्रण असून, यंदा गोरेगावच्या नेस्को मैदानात तो पार पडणार आहे. पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी न येता शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही, लोकांनीच आम्हाला विजयी केले आहे. आता आमची शक्ती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणार आहोत, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
या पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार अर्जुन खोतकर, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App