विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Ahilyanagar अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ हे नाव लिहून त्यावरून दौड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिस ठाण्याबाहेर जमावाने निदर्शने करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्च केला. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या जमावाने कोठला परिसरात महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्याला वेगळे वळण लागून काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.Ahilyanagar
यासंबंधीच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बारातोटी कारंजा परिसरात दुर्गा दौडच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीत इंग्रजी अक्षरात प्रेषित पैगंबर यांचे नाव रेखाटण्यात आले होते. त्यानंतर या नावावरून दौड नेण्यासाठी व्यवस्था करून देत जाणीवपूर्वक अपमान केला, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारा तोटी कारंजा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अल्तमश सलीम जरीवाला यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.Ahilyanagar
आंदोलकांचा पुणे – संभाजीनगर मार्गावर रास्तारोको
या घटनेनंतर व पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे आक्रमक झालेला मुस्लिम समाज कोटला परिसरात महामार्गावर उतरला. जमावाने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान काही युवकांनी रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केल्याने आंदोलनाला वेगळे वळण लागले. पोलिसांनी तत्काळ आंदोलकांवर लाठीमार करत जमावाला पांगवले. त्यामुळे पळापळ झाली. या घटनेमुळे कोठला परिसरात व संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोठला परिसरात दगडफेक व तोडफोड प्रकरणी 22 युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षकांनी दिली घटनाक्रमाची माहिती
अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणी एका समाजकंटकाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले, आज सकाळी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोडवर रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीवर मुस्लिम समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ज्यांनी रांगोळी काढली त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतरही काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी कोटला येथे रस्त्यावर येऊन रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्याची सूचना केली. त्यांना विनंती केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला. यावेळी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
मी सर्वच समाजाच्या लोकांना याद्वारे आवाहन करतो की, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अहिल्यानगर शहरात शांतता आहे. दगडफेक करणाऱ्यांना समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे पोलिस अधीक्षक म्हणाले.
कुणी आयोजित केली होती दुर्गामाता दौड?
एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कोटला गावातील दुर्गामाता दौड ही संभाजी भिडे यांच्या नेतृत्वातील हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आली होती. या संघटनेतर्फे नुकतीच सांगलीतही अशीच दौड आयोजित करण्यात आली होती. तिथे बोलताना भिडे यांनी नवरात्रीत दांडिया खेळणारे सर्वजण हांडगे असल्याची तिखट टीका केली होती.
ते म्हणाले होते, आम्हाला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको आहे. आम्हाला हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी विस्कटलेली नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडीचे आयोजन करतो. शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी शपथ घेतली तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा आरंभ होता.
पण आपण गणपती उत्सव व नवरात्रीत दांडिया खेळून त्याचे वाटोळे केले. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे, असे संभाजी भिडे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App