विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथे पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना ‘लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कारा’चे वितरण केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाद्वारे आदिवासी समाजाच्या आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण आणि इतर क्षेत्रातील जीवनमान सुधारण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे, ‘लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्काराने’ त्यांचा सन्मान करण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.
ज्येष्ठ समाजसुधारक स्व. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि आदिवासी समाजासाठी अतुलनीय सेवा केली आणि भारत जोडो यात्रेद्वारे एकतेचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचविला. हेमलकसासारख्या दुर्गम भागातही लोकबिरादरी प्रकल्प सुरू करून डॉ. प्रकाश आमटे यांनी अनेक अडचणींवर मात केली. या कार्यात सौ. मंदाकिनी आमटे यांनीही साथ दिली आणि आज आमटे कुटुंबाची तिसरी पिढी या सामाजिक प्रकल्पांसाठी सक्रिय आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे चालू ठेवण्यासाठी डॉ. आमटे यांना शुभेच्छाही दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्यासोबत विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली, अतिशय विनम्र स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते, विधिमंडळात कितीही संघर्षाची वेळ आली तरी शांतपणे तो मुद्दा हाताळण्याचे कसब हे त्यांच्याकडे होते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काही नेते हे सर्वसमावेशक मानले जायचे त्यांच्यापैकी एक लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील होते.
सातत्याने खानदेशचा विचार त्यांनी मनामध्ये ठेवला व त्यासाठी संघर्ष केला. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले. पुढील काळामध्ये सुलवाडे–जामफळसारख्या प्रकल्पांमुळे धुळे तालुक्याचा कायापालट होणार असून ज्यासाठी लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला त्या गोष्टी पुर्णत्वास जाताना आपल्याला दिसत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मनमाड–इंदूर रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹18000 हजार कोटी मंजूर केले असून, 6 राष्ट्रीय महामार्ग, मनमाड–इंदूर रेल्वे आणि नरडाणा प्रकल्प पुढील काळात पूर्ण करू. अक्कलपाडा प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी मान्यता दिली असून, त्यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देत हा प्रकल्प 100% चालेल हा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यासंदर्भात भरीव मदतीची मागणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्रात 3 डिफेन्स कॉरिडॉर निर्माण करण्यासाठीची मागणीही केली. त्यातील एक नाशिक – धुळे आहे, यामुळे धुळे जिल्ह्यातील तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार मिळेल. नंदुरबारमध्येही मोठया प्रमाणात गुंतवणूक येत असून उत्तर महाराष्ट्राला शेती सोबत औद्योगिक महत्त्व देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मध्यप्रदेश सरकारचे मंत्री कैलाश विजयवर्गीय, मंत्री जयकुमार रावल, मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार कुणाल रोहिदास पाटील, आमदार, खासदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App