विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच भागांत हाहाकार उडाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर गंभीर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर अत्यंत गंभीर आहे. यासंबंधी योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. सरकार या प्रकरणी कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ते म्हणालेत.Eknath Shinde
राज्यात गत काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली आहे. ते मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सद्यस्थितीत शेतकरी संकटात आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ मदत देण्यास आमचे प्राधान्य आहे. या प्रकरणी युद्धपातळीवर पंचनामे करून दिवाळीपूर्वी त्यांना मदत पोहोचती होईल याची काळजी घेतली जाईल.Eknath Shinde
कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल
राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावर अत्यंत गंभीर आहे. त्याचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. तूर्त सरकार कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्या सोलापूरच्या व मी स्वतः धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. आमचे सर्व मंत्रीही आपापल्या जिल्ह्यांत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतील. ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे, तिथे मदत केली जाईल. अतिवृष्टीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असे शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मराठवाड्यात परिस्थिती गंभीर आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पश्चिम महाराष्ट्रातील स्थितीचा उल्लेख केला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य स्थिती होती. ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतपिकांच्या नुकसानीसह जमीनही खरडून गेली आहे. ओढ्याच्या व नाल्याच्या शेजारी असलेल्या गावांतील संपूर्ण माती वाहून गेली आहे. त्यामुळे तिथेही मोठे नुकसान झाले आहे.
कॅबिनेटमध्ये नुकसानीवर चर्चा
पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज मंत्रिमंडळात चर्चा झाली. सरकारने या प्रकरणी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्यांनाही सरकारच्यावतीने तत्काळ मदत दिली जाईल. काही ठिकाणी पाळीव प्राण्यांचीही हानी झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. कॅबिनेटमध्ये सर्वच प्रकारच्या नुकसानीवर गांभीर्याने चर्चा झाली. शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी कायम उभे आहोत. कारण शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. आमच्या मागच्या अडीच वर्षांच्या काळातही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत किंबहुना त्यांच्यासाठी योजना राबवण्याचे काम केले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला पंचनामे नंतर करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. पत्रकारांनी याविषयी एकनाथ शिंदे यांना छेडले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे माझ्या ऐकीवात नाही. त्यामुळे सत्तेत असताना एक बोलायचे आणि विरोधी पक्षात असताना दुसरे बोलायचे अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेतली नाही. आम्ही घेणार नाही. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळेच आम्ही अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर पंचनामे करून युद्धपातळीवर लोकांना मदत करण्याचे निर्देश दिलेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App