विशेष प्रतिनिधी
सांगली : Jitendra Awhad : त्यांच्यावर झालेल्या खालच्या पातळीच्या टीकेनंतरही जयंत पाटील शांत राहिले, परंतु मी तसे करणार नाही, असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.
काही दिवसांपूर्वी जत येथील सभेत बोलताना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील हे राजारामबापूंची अवलाद नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनीही या वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांची पाठराखण केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. स्वतः शरद पवार यांनीदेखील पडळकर यांची तक्रार फडणवीसांकडे केली होती. गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. धनगर समाजातील व्यक्तींनीही गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगली येथे संस्कृती बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जयंत पाटील गप्प बसले असतील, पण मी गप्प बसणार नाही.” पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना हात जोडून सल्ला दिला, “तुम्ही असेच बोलत राहा, आपल्या मूळ संस्कृतीची महाराष्ट्राला ओळख करून द्या. आपण खरे कसे आहोत, हे महाराष्ट्राला कळू द्या.”
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनात गोपीचंद पडळकर यांना ‘मंगळसूत्र चोर’ का म्हटले, याचाही किस्सा सांगितला. ते म्हणाले की, विधान भवनात जात असताना गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्याबद्दल ‘हा बघा लांड्याचा’ असे उद्देशून बोलले होते. त्यामुळे आपण त्यांना ‘मंगळसूत्र चोर’ म्हटले, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आधीपासूनच तणावपूर्ण संबंध आहेत. यापूर्वीही या दोघांनी एकमेकांबद्दल अपशब्द वापरले आहेत. आता पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना डिवचले आहे. त्यावर गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App