विशेष प्रतिनिधी
मुंबई: Sada Saravankar : अमित ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवून मनसेला शिंगावर घेणारे सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांचे पाय धरून नमस्कार केला. या कृतीमुळे आता सर्वत्र चर्चा होत आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्क येथील जिमखान्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकृत जिमखान्याचे उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन समारंभाला शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर, राज ठाकरे आणि आशिष शेलार हे तिघे एकत्र दिसले. या समारंभात सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांचे पाय धरून नमस्कार केला. वयाने सत्तर वर्षांचे असलेले सदा सरवणकर यांनी 57 वर्षांचे राज ठाकरे यांचे पाय धरल्याने आता समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. या उपकाराची परतफेड म्हणून महायुती माहीम मतदारसंघात उमेदवार देणार नाही, अशी चर्चा होती. परंतु, शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले. माहीम मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे आणि सदा सरवणकर दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे आणि अमित ठाकरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यामुळे राज ठाकरे यांचा सरवणकर यांच्यावर राग असल्याचे बोलले जात होते. सदा सरवणकर यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, पण राज ठाकरे यांनी भेटण्यास नकार दिला होता. आता सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांचे थेट पाय धरल्याने याची चर्चा होत आहे.
तसेच, या वेळी राज ठाकरे आणि आशिष शेलार एकत्र दिसले, परंतु त्यांनी एकमेकांना भेटणे टाळले. काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि आपल्यातील वैयक्तिक मैत्री संपल्याचे जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीत आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आशिष शेलार आणि मनसे यांच्यात खटके उडाल्याचे दिसून आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App