नाशिक : “साहेबांचा पक्ष” ही प्रतिमा पुसण्याचा शरद पवारांच्या भाषणातून प्रयत्न; पठडीबाज मराठा राजकारणातून बाहेर पडायचा यत्न!!, ही आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराची फलश्रुती ठरली. पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींचा मत चोरीचा अजेंडा राबविला. पण पवारांनी समारोपाच्या भाषणात त्या मुद्द्याचा उल्लेखही केला नाही. त्या उलट साहेबांचा पक्ष ही प्रतिमा पुसून आपली राष्ट्रवादी काँग्रेस सर्व समावेशक पक्ष आहे असे सांगत त्यांनी मराठा राजकारणातून बाहेर पडायचा यत्न केला.
– देवाभाऊ जाहिरातीला प्रत्युत्तर
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवातच देवाला प्रश्न विचारून झाली. देवाभाऊच्या जाहिरातींना देवा तूच सांग अशा जाहिरातींचे प्रत्युत्तर देऊन पवारांच्या पक्षाने सरकारला टार्गेट करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये रोहित पवार आघाडीवर राहिले. पण बाकीच्या नेत्यांनी त्यांना फारशी हवा दिली नाही. त्या उलट शशिकांत शिंदे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड वगैरे सगळ्या नेत्यांनी भाषणे करताना राष्ट्रवादी काँग्रेसचा “साहेबांचा पक्ष” असल्याचे ठासून सांगितले. साहेबांचा विचार सगळ्या महाराष्ट्रात फैलावून साहेबांचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात वाढवू, अशी ग्वाही सगळ्या नेत्यांनी दिली. सगळ्यांनी साहेबांच्या ताकदीवर प्रचंड विश्वास व्यक्त केला. उत्तम जानकर वगैरे नेत्यांनी मत चोरीचा अजेंडा चालविला.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे भाषण वेगळे ठरले. त्यांनी पक्षाला सर्वसमावेशक भूमिका घ्यायला सांगितले. समाजामध्ये जातीच्या आधारावर फूट पडली आहे मराठा समाजाने हॉटेल सुरू केले तर इतर समाजाचे लोक त्यात जात नाहीत. इतर समाजाने हॉटेल सुरू केले, तर मराठा समाजाचे लोक त्यामध्ये जात नाहीत, अशी चर्चा ऐकायला येते. हे सामाजिक ऐक्याची वीण उसवल्याचे लक्षण आहे. पण आपण सगळ्यांनी वाटेल ती राजकीय किंमत देऊन सामाजिक ऐक्य टिकवले पाहिजे, असा आग्रह शरद पवारांनी धरला.
– जरांगेंशी कवडीचाही संबंध नाही
शरद पवारांनी सकाळच्याच पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाशी आपला कवडीचाही संबंध नसल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ त्यांनी जाहीर भाषणामध्ये सर्वसमावेशक भूमिका घेतली. याचाच अर्थ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मराठा राजकारणातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविला. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी अधिकारी यात्रा काढली. त्याला अनुसरूनच पवारांची आजची भूमिका समोर आली. देवा तूच सांग या जाहिरातीत पिवळ्या रंगाची उधळण आणि स्टेजवर देखील पिवळ्या रंगाची उधळण हे पवारांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सरकल्याचे चिन्ह आजच्या प्रशिक्षण शिबिरातून दिसले.
– साहेबांचा पक्ष प्रतिमा पुसायचा प्रयत्न
त्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे साहेबांचा पक्ष ही प्रतिमा पुसायचा प्रयत्न केला शशिकांत शिंदे यांच्यापासून सगळ्या नेत्यांनी भाषणातून साहेबांचा पक्ष हा उल्लेख केला तो आपल्याला पटला नाही राष्ट्रवादी विचारांच्या सगळ्यांचा हा पक्ष आहे तो आपण सगळ्यांनी पुढे न्यायचा आहे. हा कुठल्याही एका व्यक्तीचा पक्ष नाही, असे शरद पवारांनी समारोपाच्या भाषणातल्या समारोपात सांगितले. या सगळ्यातून पठडीबाज मराठा राजकारणातून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसला. अर्थात तो कितपत यशस्वी होईल हे येणारा काळ सांगेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App